विज्ञान चळवळींनी समाजविज्ञानापर्यत पोहचावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:12+5:302021-03-15T04:23:12+5:30
कोल्हापूर: विज्ञान चळवळींनी फक्त निसर्ग विज्ञानापर्यंत स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी समाजविज्ञानपर्यंत पोहोचायला हवे, असे मत लोक विज्ञानाचे ज्येष्ठ ...
कोल्हापूर: विज्ञान चळवळींनी फक्त निसर्ग विज्ञानापर्यंत स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी समाजविज्ञानपर्यंत पोहोचायला हवे, असे मत लोक विज्ञानाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. आनंद फडके यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रकाशित केलेल्या ‘विज्ञान वेध - जिवाणू ते इंद्रधनू’ या सुजाता म्हेत्रे लिखित पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन, स्टीफन हॉकिंग व कार्ल मार्क्स यांचा स्मृतिदिन असलेला १४ मार्च हा विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा दिवस आहे. या औचित्याने विज्ञानविषयक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुसंस्कार हायस्कूल भाेसलेवाडी कदमावडी येथे नाट्यअभिनेते डॉ. शरद भुथाडिया यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. फडके यांनी ‘विज्ञान चळवळींची ताकत आणि मर्यादा’ या विषयावर थेट पुण्याहून ऑनलाइन संवाद साधला. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे होते. आकाशवाणीवरुन प्रसारित झालेल्या विज्ञानजगत कार्यक्रमातील भागांचे संकलन करून हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेली अंधश्रद्धा निर्मूलन समिती व त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसाराचे काम अधोरेखित करून फडके यांनी धर्मचिकित्सा करत असताना फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा निसर्ग विज्ञानापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता व्यापकता वाढवण्याच्या दृष्टीने समाज विज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार केला जावा, असे सांगितले.
प्रास्ताविक आणि स्वागत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी केले. पुस्तक परिचय अंनिवाचे माजी संपादक प्रा.प.रा. आर्डे यांनी करून दिला. सूत्रसंचालन यश तांबोळी यांनी केले. ऑनलाइन प्रक्षेपणाची जबाबदारी राजवैभव शोभा रामचंद्र यांनी पार पाडली.
फोटो: १४०३२०२१-कोल-विज्ञान
फोटो ओळ: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रकाशित केलेल्या ‘विज्ञान वेध-जिवाणू ते इंद्रधनू’ या सुजाता म्हेत्रे लिखित पुस्तकाचे रविवारी ऑनलाइन पध्दतीने प्रकाशन झाले.