विज्ञान यात्रा आजपासून
By Admin | Published: February 27, 2017 11:55 PM2017-02-27T23:55:09+5:302017-02-27T23:55:09+5:30
‘लोकमत’तर्फे आयोजन : बालचमूंना अनुभवता येणार फिरते थ्रीडी तारांगण
कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून बालचमूंसाठी औत्सुक्याचा विषय ठरलेल्या लोकमत ‘विज्ञान यात्रे’ला आज, मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दोन दिवस होत असलेल्या या यात्रेत शालेय विद्यार्थ्यांनी संशोधनातून साकारलेले वैज्ञानिक प्रयोग पाहता व अनुभवता येणार आहे. राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे बालविकास मंच व ‘डाईस’तर्फे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारे ‘विज्ञान यात्रा २०१७’ या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन मंगळवारी व बुधवारी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. विज्ञान म्हणजे अलिबाबाची गुहा. या गुहेच्या पोतडीत विद्यार्थ्यांनी साकारलेले प्रयोग पाहताना बालचमूंसह मोठ्यांनाही विस्मयकारी वाटतात आणि आपसूकच ‘वा..छान’ असे शब्द ओठावर येतात. विद्यार्थ्यांना आपल्या वैज्ञानिक कल्पनेतून नवं काही साकारण्याच्या संधीचे केलेले सोनं पाहायला नक्की या विज्ञान यात्रेला भेट द्या. आपल्यावर झालेल्या कौतुकाच्या वर्षावाने मुलांमध्ये पुन्हा नवप्रयोगाचे बीज रोवण्याची ऊर्मी येईल. विद्यार्थ्यांनी साकारलेले भन्नाट प्रयोग पाहण्याची संधी चुकवू नका. आपल्या पाल्यांना घेऊन आवश्य विज्ञान यात्रेला भेट द्या.
या विज्ञान यात्रेत फिरते थ्री डी तारांगण पाहण्याची संधीही विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दिशा पाटील यांचे डाइस अकॅ डमी हे आहेत. विप्रास टेक्नोमार्ट, गुरुकृपा हस्ताक्षर सुधारणा वर्ग, स्मार्ट कीड अबॅकस, अॅडव्हान्स्ड डेंटल केअर हे सहप्रायोजक आहेत, तर चाटे स्कूल व गुरमूर डेकोरेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.
परदेशी प्लॅनेटोरियमविषयी...
लोकमत बाल विकास मंचतर्फे व खास विद्यार्थ्यांसाठी डॉ. परदेशी प्लॅनेटोरियमच्यावतीने नेहरू तारांगणाच्या धर्तीवर विशेष शो सादर होणार आहे. यातील प्रत्येक शो ३० मिनिटांचा असून, तो इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये आहे. जपानच्या गोटॅनिक प्लॅनेटोरियम व नासा यांनी तयार केलेले आहेत. याद्वारे अवघड खगोलशास्त्रीय कल्पना, सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रहांचे भ्रमण, ग्रहणे, इ.ची सखोल माहिती दाखविण्यात येणार आहे.
याच रिअल टाईम थ्री-डी प्लॅनेटोरियममध्ये आपण प्रत्यक्ष अंतराळात आहोत, असा भास होतो. आपल्या शाळेतील ६० मुलांची एक बॅच याप्रमाणे आपणास सहभागी होता येईल. सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत एकूण दहा शो होणार आहेत. सकाळी ११ वा. शो सुरू होईल. प्रत्येक शो अर्ध्या तासाचा होणार आहे. या शोसाठी प्रवेश शुल्क प्रति विद्यार्थी ६० रुपये असून, प्रदर्शन स्थळी तिकीट विक्री सुरू आहे. अधिक माहितीसाठी ९५७९२३१५२० या क्रमांकावर संपर्क साधावा.