पाकिस्तानमधील शास्त्रज्ञांना प्रसाद संकपाळ यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 10:30 AM2020-04-30T10:30:42+5:302020-04-30T10:33:18+5:30
रविवारी (दि. २६)रात्री नऊ वाजून ३० मिनिटांनी हे थेट संवादाचे आयोजन केले होते. या ३० मिनिटांच्या कालावधीमध्ये प्रसाद संकपाळ यांना साधारणपणे आठ ते दहा प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी या शास्त्रज्ञांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
कोल्हापूर : जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी पाकिस्तानमधील तरुण शास्त्रज्ञांना समुदायस्थित आपत्ती व्यवस्थापनाचे धडे ‘फेसबुक’ लाईव्हच्या माध्यमातून दिले.
पाकिस्तानमधील विविध क्षेत्रांत काम करणारे इंजिनिअर, माहिती आणि तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रात काम करणारे युवक अशा सर्व तरुणांनी मिळून राष्ट्रीय पातळीवर ‘दि नॅशनल डायलॉग आॅन क्लायमेट चेंज’ या नावाने एक फोरम सुरू केला आहे. या फोरमच्या माध्यमातून सद्य:स्थितीला पाकिस्तानमधील सुमारे १० हजार तरुण शास्त्रज्ञ एकत्र जोडले गेले आहेत. या ‘नॅशनल डायलॉग आॅन क्लायमेट चेंज’ या फोरमच्या प्रमुख मुंतहा उर्ज यांनी प्रसाद संकपाळ यांचे आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील काम जवळून पाहिले आहे.
या नॅशनल डायलॉग आॅन क्लायमेट चेंज या फोरमचे सुमारे नऊ हजार शास्त्रज्ञ सदस्य आहेत. त्या सर्वांसाठी रविवारी (दि. २६)रात्री नऊ वाजून ३० मिनिटांनी हे थेट संवादाचे आयोजन केले होते. या ३० मिनिटांच्या कालावधीमध्ये प्रसाद संकपाळ यांना साधारणपणे आठ ते दहा प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी या शास्त्रज्ञांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
या विषयांवर चर्चा
समुदायस्थित आपत्ती व्यवस्थापन कसे करावे; तरुणाईला आपत्ती व्यवस्थापनामध्ये कसे सहभागी करून घ्यावे; महिलांना आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसे आणावे; कोणतीही आपत्ती जर एखाद्या समुदायामध्ये, देशामध्ये जर निर्माण झाली तर कमीत कमी धोका कसा होईल; लोकांचे जीव कसे वाचतील, आदी विषयांवर चर्चा झाली.
कोल्हापूरमधील कामाचे कौतुक
भारत, महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाची माहिती या सर्व शास्त्रज्ञांनी जाणून घेतली. कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.