जिल्हा बँकेच्या गारगोटी शाखेत सोने तारणावर डल्ला
By admin | Published: December 1, 2015 12:46 AM2015-12-01T00:46:16+5:302015-12-01T00:46:37+5:30
पैसे भरून प्रकरणावर पडदा टाकण्याच्या हालचाली
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) गारगोटी शाखेत सोने तारण कर्ज प्रकरणात शाखाधिकाऱ्यानेच डल्ला मारला असल्याचे समजते. गेली दोन दिवस बँकेत या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. संबंधित व्यक्तीने आपली जमीन विकून पैसे देण्याचे मान्य केल्याने ही रक्कम भरून घेऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न व्यवस्थापनाकडून सुरू आहेत. त्यामुळे नक्की किती रक्कम आहे याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. प्रत्यक्षात १० ग्रॅम सोने तारण ठेवून कागदोपत्री मात्र शंभर ग्रॅम दाखवायचे, आठ हजार रुपये कर्ज दिले असताना ते २८ हजार रुपये दिल्याचे दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच तालुक्यातील ‘विजय’ने छंदावर पैसा उधळण्यासाठी हा डल्ला मारला असल्याची माहिती पुढे येत आहे. प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम २५ लाखांपर्यंत असल्याचे समजते; परंतु त्यास बँकेकडून दुजोरा मिळू शकला नाही.
जिल्हा बँक तोळ््यास सोळा हजार रुपये कर्ज सोने तारणावर देते. त्याचे व्याज वर्षाला भरून घेण्यात येते. काहीवेळेला संबंधित कर्जदारास व्याज भरता आले नाही तर त्या शाखेच्या पातळीवरच सोन्याचे ग्रॅम वाढवून दाखविण्याचा प्रकार होतो. गारगोटीचे प्रकरण तसेच घडले आहे. संबंधित कर्जदार, शाखाधिकारी आणि सुवर्णकाराच्या संगनमताने हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. कर्जाची रक्कम वाढल्यावर शाखाधिकाऱ्याने कागदोपत्री खाडाखोड करून तारण ठेवलेले सोन्याचे वजन कागदावर वाढवून दाखविले आहे. त्यासंबंधीची तक्रार बँकेकडे झाल्यावर बँकेने याची चौकशी सुरू केली आहे; परंतु संबंधित व्यक्ती जमीन विकून पैसे भागवितो, असे आश्वासन देत आहे. त्यामुळे बँकेने त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पैसे वसूल करण्यास प्राधान्य दिले आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांना काहीजणांकडून पाठीशी घातले जात असल्याच्या तक्रारी आहेत. आता कुठे बँक अडचणीतून बाहेर येऊ लागली आहे. बँकेच्या कारभाराबद्दल नव्याने विश्वास निर्माण होऊ लागला असताना अशा प्रकरणामुळे बँकेच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचीही चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. (प्रतिनिधी)