नगरसचिवपदाच्या कार्यभाराचा पेच

By admin | Published: May 26, 2016 12:14 AM2016-05-26T00:14:17+5:302016-05-26T00:19:26+5:30

आज स्थायी सभा : उमेश रणदिवे रजेवर; इतर अधिकाऱ्यांचा कार्यभारास नकार

The scope of the municipal workload | नगरसचिवपदाच्या कार्यभाराचा पेच

नगरसचिवपदाच्या कार्यभाराचा पेच

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेचे नगरसचिव तथा सहायक आयुक्त उमेश रणदिवे अचानक रजा काढून गेल्यामुळे त्यांच्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार स्वीकारण्यास कोणी अधिकारी तयार झालेला नाही. बुधवारी दिवसभर या पदाचा कार्यभार सांभाळील अशा सक्षम अधिकाऱ्याचा शोध सुरू होता; पण सायंकाळपर्यंत त्यात अधिकाऱ्यांना अपयश आले. दरम्यान, आज, गुरुवारी सकाळी स्थायी समितीची सभा होत आहे.
महानगरपालिकेच्या सत्तासंघर्षातून नगरसचिव उमेश रणदिवे यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाव येत असल्याने त्यांनी आपल्याकडील नगरसचिवपदाचा कार्यभार काढून घ्यावा, अशी विनंती आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे; पण आयुक्तांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. सध्या ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून सुनील कदम यांना घेण्याच्या ठरावावरून सभागृहातील सत्तासंघर्ष टोकाला गेला आहे. त्यामुळे रणदिवे यांच्यावरील हा दबाव अधिकच वाढला आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारपासून अचानक रजा काढली असून सोमवार (दि. ३०) पासून ते दीर्घ मुदतीच्या रजेवर जाण्याचा विचार करीत आहेत.
आज, गुरुवारी स्थायी समितीची सभा होत आहे. त्यामुळे नगरसचिवपदाचा कार्यभार तात्पुरता कोणाकडे तरी सोपवावा लागणार आहे. त्यामुळे उपायुक्त विजय खोराटे सकाळपासून सक्षम अधिकाऱ्याच्या शोधात होते. त्यांनी दोन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली; पण त्यांनी हा पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली.

महानगरपालिका आयुक्त
पी. शिवशंकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून तो मंजूर करण्याच्या हालचाली पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत. या ठरावाद्वारे राज्य सरकारकडे त्यांच्या बदलीची मागणी करण्यात येणार आहे. १६ एप्रिलला झालेल्या सभेत हा ठराव करण्यात यावा, असा आग्रह नगरसेवकांना धरला, परंतु असा ठराव आयत्या वेळी घेता येत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने तो मागे ठेवण्यात आला होता.
आयुक्त पी. शिवशंकर नगरसेवकांची कायदेशीर कामे करत नाहीत, नगरसेवकांचा सन्मान राखत नाहीत, त्यांचा प्रशासनावर वचक नाही, एखाद्या फाईलवर निर्णय घ्यायला जाणीवपूर्वक विलंब लावतात, असे आक्षेप त्यांच्या कामकाजावर घेण्यात आले आहेत.
१६ एप्रिलला कारभारी नगरसेवकांनी पुढाकार घेत तातडीने ७२ नगरसेवकांच्या सह्या घेऊन आयुक्तांवर अविश्वास दाखवून बदलीचा ठराव करावा, अशी मागणी महापौर अश्विनी रामाणे यांच्याकडे करण्यात आली होती; परंतु आयुक्तांच्या बदलीचा ठराव असा अचानक सभेत चर्चेला घेत येणार नाही. तो विषय अजेंड्यावर घ्यावा लागेल, असे स्पष्टीकरण देण्यात आल्यामुळे हा ठराव मागे ठेवण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा हा बदलीचा ठराव करण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. त्यास काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे; पण भाजप-ताराराणी आघाडी त्याला विरोध करण्याची शक्यता आहे.

Web Title: The scope of the municipal workload

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.