स्काऊट गाईडमध्ये सलग आठ वर्षे प्रथम
By Admin | Published: February 9, 2015 12:17 AM2015-02-09T00:17:24+5:302015-02-09T00:39:30+5:30
निमशिरगाव विद्यामंदिरची गरुडभरारी : विद्यार्थ्यांकडून नेत्रदीपक संचलन
जयसिंगपूर : जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सलग आठ वर्षे जिल्हास्तरीय स्काऊट गाईड स्पर्धेत निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. चारित्र्य, हस्तव्यवसाय, आरोग्य व सेवा या चार मूलभूत याच्या आधारे विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. विश्वबंधुत्वाची भावना, प्रखर राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, सेवावृत्ती, राष्ट्रीय एकात्मता व साहसी वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार व दिशा देण्यासाठी स्काऊट गाईड ही चळवळ सुरू झाली आहे. सुजाण नागरिक घडविण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी मूल्य शिक्षणावर आधारित असलेल्या स्काऊट गाईडच्या माध्यमातून निमशिरगावमधील कुमार विद्यामंदिरचे विद्यार्थी आपल्यातील कौशल्य दाखवित आहेत. संचलन स्पर्धेमध्ये सलग आठ वर्षे या शाळेतील विद्यार्थी सर्वोत्तम ठरले आहेत. स्काऊट गाईडअंतर्गत शाळेमध्ये ध्वजारोहण करण्याचीही परंपरा आहे.
मूल्य शिक्षणावर आधारित बोधकथा, पर्यावरण याबाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. ध्वजबांधणीसाठीही विद्यार्थी तयार झाले आहेत. संचलन, झांजपथक, लेझीम, घरामधील स्वच्छतेपासून वैयक्तिक नीटनेटकेपणा, स्वत:चे साहित्य कसे हाताळावे, समाजामध्ये सत्कार्य करण्याची भावना या माध्यमातून आपले कौशल्य विद्यार्थ्यांनी अंगिकारले आहे. या सर्व उपक्रमाचा शाळेमध्ये दैनंदिन
आढावा घेतला जातो. गावाच्या यात्रेत स्काऊट गाईडचे विद्यार्थी संचलनातून आपल्या शिस्तीचे दर्शन घडवितात. अत्यंत नीटनेटकेपणाने या विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांच्या या सर्व यशात शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय समूहनृत्य, तंबू सजावट, झांजपथक, लेझीम, समूहगीत या स्पर्धांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सुभाष चव्हाण हे स्काऊट मास्टर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.