‘किफ’चा पडदा आज उघडणार

By Admin | Published: December 22, 2016 12:52 AM2016-12-22T00:52:41+5:302016-12-22T00:52:41+5:30

रोज पंधरा चित्रपट : स्वातंत्र्यलढ्यावर आधारित पोस्टर प्रदर्शन

The screen of 'keef' will open today | ‘किफ’चा पडदा आज उघडणार

‘किफ’चा पडदा आज उघडणार

googlenewsNext

कोल्हापूर : जगभरातील विविध भाषांतील सुमारे ५० चित्रपट, तितकेच लघुपट, स्वातंत्र्यलढ्यावर आधारित असलेल्या माहितीपटांसह पोस्टर प्रदर्शन अशा भरगच्च मनोरंजनासह प्रेक्षकांची अभिरुची समृद्ध करणाऱ्या पाचव्या कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (किफ)चा पडदा आज, गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता उघडणार आहे.
महाराष्ट्र शासन पुरस्कृत कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे आयोजित हा चित्रपट महोत्सव दि. २९ पर्यंत दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे भरणार आहे. ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ या बांगलादेशी चित्रपटाने महोत्सवास प्रारंभ होईल. या महोत्सवात तीन पडद्यांवर दररोज पंधरा चित्रपटांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतीय स्वातंत्र्यावर आधारित सात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्राने ‘७० साल आझादी - याद करो कुर्बानी’ या योजनेअंतर्गत पाठविलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. स्वातंत्र्यलढ्यावर आधारित काही निवडक चित्रपटांच्या पोस्टरचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. काही माहितीपटही दाखविणार आहेत. ‘माय मराठी’ या विभागात ‘कावळा’, ‘ब्रेव्हहार्ट’, ‘कासव’, ‘भॉऽऽ’, ‘सायकल’, ‘माचीवरचा बुधा’ हे वेगळ्या ढंगाचे पहिल्यांदाच प्रदर्शित होणारे चित्रपट विशेष आकर्षण ठरणार आहेत. त्याचबरोबर विविध देशांतील जागतिक चित्रपट १५, भारतीय विविध भाषांतील ‘विविध भारती’ या विभागात सात, भारतीय दिग्दर्शक व विदेशी दिग्दर्शक ‘मागोवा’ या विभागात सहा, लक्षवेधी देश सात, शिवाय गुरू तुळशीदास बोरकरांवरील ‘संवादिनी साधक’, ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील ‘जिप्सी’ हे माहितीपट दाखविणार आहेत. श्रद्धांजली विभागात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अब्बास किरोस्तोमी यांचा ‘ट्रॅव्हलर’, आंद्रेज वाजदांचा ‘कत्यान’ हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
महोत्सव काळात दररोज सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मुक्त संवाद होणार आहे. त्यामध्ये दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ यांच्या चर्चा, भेटी, पुस्तक प्रदर्शन, आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)


महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मल्याळम दिग्दर्शक शाजी करुण यांना मान्यवरांच्या हस्ते आज, गुरुवारी ‘कलामहर्षी बाबूराव पेंटर’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: The screen of 'keef' will open today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.