केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:41+5:302020-12-08T04:20:41+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले केशवराव भोसले नाट्यगृह सुरू करण्यास महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले केशवराव भोसले नाट्यगृह सुरू करण्यास महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी परवानी दिली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या या ऐतिहासिक नाट्यगृहाचा पडदा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे मात्र संबंधित नाट्य कंपन्यांना पालन करावे लागणार आहे.
महानगरपालिकेचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आले होते. राज्य सरकारनेच कोरोना प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी शासनानेच निर्बंध आणले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांवर जिल्हाधिकारी यांनी बंदी आदेश दिले होते. त्याप्रमाणे दि. १५ मार्चपासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाकडील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून नाट्यगृह बंद ठेवण्यात आले होते.
आता ‘मिशन बिगीन अगेन’ या अंतर्गत नाट्यगृहे पुन्हा सुरू करण्याबाबत शासन आदेश प्राप्त झाले आहेत. कोविड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वे यांचे अनुपालन करून नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह सोमवारपासून शासन मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून सुरू करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नाट्यगृहाचा वापर हा आसनक्षमतेच्या पन्नास टक्के इतकाच राहणार आहे.
मास्क असल्याखेरीज कोणलाही नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार नाही. प्रेक्षकांचे तापमान तपासणी, निर्जंतुकीकरण, कलाकारांची वैद्यकीय तपासणी, सुरक्षित अंतर, परिसरात स्वच्छता, थुंकण्यास मनाई, नाट्यगृहात प्रवेश करताना सुरक्षित अंतर ठेवून रांग करणे, नाट्यगृहात खाद्यपदार्थांना मनाई, आदी बाबींचे शासन मार्गदर्शक तत्त्वानुसार काटेकोर पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
लाईटमन, साऊंड ऑपरेटरना मुदतवाढ
महानगरपालिकेचे लाईटमन व साऊंड ऑपरेटर निवृत्त झाले आहेत. नाट्यगृह बंद असताना अडचण आली नाही. परंतु, आता नाट्यगृह सुरू करीत असताना निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.