पडदा उघडला पण आव्हाने कायम

By admin | Published: March 8, 2016 12:23 AM2016-03-08T00:23:22+5:302016-03-08T00:50:49+5:30

केशवराव भोसले नाट्यगृह : अत्याधुनिक नाट्यगृह सांभाळणे रसिक, मनपाची जबाबदारी

The screen opened but the challenges remained | पडदा उघडला पण आव्हाने कायम

पडदा उघडला पण आव्हाने कायम

Next

सचिन भोसले -- कोल्हापूर -संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण नुकतेच झाले. राज्यातील अत्याधुनिक नाट्यगृहांच्या पंगतीतही हे नाट्यगृह जाऊन बसले. मात्र, या नाट्यगृहाच्या दुरुस्ती-देखभालीसाठी विशेष काळजी आणि तरतूदही करावी लागणार आहे. त्यामुळे या रंगमंचाचा पडदा उघडला खरा, पण आव्हाने कायम आहेत, अशी स्थिती आहे.
सन १९१३ मध्ये राजर्षी शाहू महाराज रोम दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी थिएटर आणि कुस्ती मैदान पाहून कोल्हापुरात खासबागेत ‘पॅलेस थिएटर’ बांधले. सन १९५७ ‘पॅलेस थिएटर’चे नामकरण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह झाले. त्यानंतर त्याचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. सन १९८४ मध्ये हा ताबा महापालिकेकडे हस्तांतरण झाला. काही दिवसांतच दि. ९ मे १९८४ ला या नाट्यगृहाचे व कुस्ती मैदानाचे नूतनीकरण झाले. सन २००५ ला पुन्हा नूतनीकरण झाले. यावेळी नाट्यगृहातील लाईट, साऊंड सिस्टीम, अंतर्गत सजावट, खुर्च्या, बदलण्यात आल्या. कालांतराने पुन्हा तिसऱ्यांदा दुरुस्ती आणि देखभाल गरजेचे बनल्याने सन २०१४ नूतनीकरण करण्यास प्रारंभ झाला आणि जुलै २०१५ ला काम पूर्ण झाले. त्यात पूर्वीची ७४२ आसन क्षमता होती. ती कमी करून ७०३ इतकी करण्यात आली. खुर्च्या अत्यंत आरामदायी व आलिशान अशा आहेत. याशिवाय संपूर्ण नाट्यगृह वातानुकूलित करण्यात आले आहे. अत्याधुनिक अशी ध्वनी योजना नाट्यगृहात बसविण्यात आली आहे. नाट्यकर्मी, रसिक यांना निश्चितच आवडेल असे नाट्यगृह बनविण्यात आले आहे. मात्र, नाट्यकर्मी संस्थांना येथे प्रयोग करताना या सर्व बाबींचा विचार करून शुल्क भरताना हात जरा ढिला सोडावा लागणार आहे. रसिकांनीही नाट्यगृहाची स्वच्छताही राखणेही तितकेच गरजेचे आहे.


बुकिंगचा ओघ वाढला पण...
एक माध्यम समूह, प्रत्यय हौशी नाट्यसंस्था, नाट्य वितरक, दोन शाळा, एका कविसंमलेनाकरिता हे नाट्यगृह हवे असल्याचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, अद्याप शुल्क निश्चित नसल्याने या सर्वांना तारखा नाट्यगृह व्यवस्थापनाने दिलेल्या नाहीत.
सुरक्षा रक्षकांचीही गरज
नाट्यगृहात बसविण्यात आलेल्या खुर्च्या महागड्या आहेत. त्यांची किंमत प्रत्येकी १२ हजारांहून अधिक आहे. येणाऱ्या प्रेक्षकांवर नजर व नाट्यगृहाची सुरक्षा राखण्यासाठी तीन शिफ्टमध्ये एकूण १२ सुरक्षा रक्षकांची गरज आहे. त्यांच्या पगाराची तरतूदही दुरुस्ती देखभालमध्ये अधिक होणार आहे.

प्रकाश व ध्वनीसाठी १.४० कोटी खर्च
बॉश कंपनीचे ३२ चॅनेल असलेले शब्द फेकीचे अचूक चढ-उतार प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था असलेल्या ध्वनियोजनेवर ८० लाख, तर अत्याधुनिक प्रकाश योजनेकरिता ४० लाखांची १२ स्पॉट लाईट व १५ पार लाईटची सोय नाट्यगृहात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अशी सोय असलेले हे एकमेव नाट्यगृह आहे.

रसिकांसाठी आचारसंहिता व शुल्कवाढ करताना तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्यास पाच हजार शुल्क भरण्यास काहीच हरकत नाही. मात्र, त्यापेक्षा अधिक शुल्क नको.
- प्रफुल्ल महाजन,
नाट्य वितरक, कोल्हापूर

नाट्यगृहाचा दुरुस्ती-देखभाल खर्च अफाट आहे. त्यामुळे अंदाजित शुल्क किमान ७५०० रुपये इतके तीन तासांसाठी होईल. याशिवाय विजेचा खर्च वेगळा आकारला जाणार आहे. शुल्कवाढीचा प्रस्ताव अभ्यासपूर्ण करून तयार केला जाईल. हा प्रशासनाकडून महासभेपुढे ठेवला जाईल. त्यात शुल्क किती लावायचे यावर मोहोर लागेल. - विजय वणकुद्रे, व्यवस्थापक, केशवराव भोसले नाट्यगृह


‘लावणी’ बंद होणार
लावणी पाहण्यासाठी येणारा प्रेक्षकवर्ग काहीसे हीन दर्जाचे वर्तन, खुर्च्यांची तोडफोड, मद्यपान करून येणारा असल्याने लावणी कार्यक्रमाला नाट्यगृह देण्यास बंदी येण्याची शक्यता असल्याचे लोकप्रतिनिधींकडून सूतोवाच केले जात आहे.

Web Title: The screen opened but the challenges remained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.