बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग करा : जिल्हाधिकारी देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 05:32 PM2020-06-24T17:32:35+5:302020-06-24T17:33:55+5:30

बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग झाले पाहिजे. त्यातून कोणीही सुटणार नाही याची दक्षता घ्या. ६० वर्षांपुढील तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींची स्रावतपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर गावामध्ये कोविड काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण यांसाठी हॉटेल, रिसॉर्ट यांच्याशी चर्चा करून पर्यायी नियोजन सज्ज ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

Screening of people coming from outside districts: Collector Desai; Have a facility at the segregation center | बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग करा : जिल्हाधिकारी देसाई

बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग करा : जिल्हाधिकारी देसाई

Next
ठळक मुद्देबाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग करा : जिल्हाधिकारी देसाईअलगीकरण केंद्रात सुविधा सज्ज ठेवा

कोल्हापूर : बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग झाले पाहिजे. त्यातून कोणीही सुटणार नाही याची दक्षता घ्या. ६० वर्षांपुढील तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींची स्रावतपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर गावामध्ये कोविड काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण यांसाठी हॉटेल, रिसॉर्ट यांच्याशी चर्चा करून पर्यायी नियोजन सज्ज ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

जिल्हाधिकारी म्हणाले, बाहेरील जिल्ह्यांतून तपासणी नाक्यावरून येणाऱ्या व्यक्ती त्यांना दिलेल्या रुग्णालयांत तपासणीसाठी जातात का, याची तपासणी करायला हवी. यातून एकही व्यक्ती सुटता कामा नये. पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासितांची माहिती प्रभावीपणे दक्ष राहून गोळा करा.

कोविड काळजी केंद्र तसेच संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर, एन-९५ मास्क, पल्स ऑक्सिमीटर यांबाबत सुविधा सज्ज ठेवा. त्याचबरोबर हॉटेल, रिसॉर्ट यांच्याशी चर्चा करून पेड आयक्यूबाबत नियोजन करा. प्रत्येक कोविड काळजी केंद्रासाठी १५ ऑक्सिजन सिलिंडर ठेवावेत. त्याचबरोबर जिल्हा कोविड आरोग्य केंद्रात एकूण खाटांच्या ५० टक्के ऑक्सिजन सिलिंडरची सोय असली पाहिजे. कोविड काळजी केंद्रात आलेल्या प्रत्येकाला आरोग्य सेतू ॲप इन्स्टॉल करायला सांगा. त्याचबरोबर संगणक प्रणालीमध्ये रोजच्या रोज माहिती भरा, ती तपासा आणि तिचा स्क्रीनिंगसाठी पाठपुरावा करा.

महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

करवीर, कागलचे काम चांगले

महाआयुष सर्व्हेक्षणात राधानगरी, कागल आणि करवीर यांनी चांगले काम केले आहे. इतर तालुक्यांनीही दोन दिवसांत सर्व्हेक्षणाचे काम संपवावे. आकस्मिकतेबाबतचे नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

पूरबाधित गावांत माहितीपुस्तिका पोहोच करा

पूरबाधित गावांमधील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी माहितीपुस्तिका तयार करून ती गावागावांत पोहोच करा. त्यामध्ये निवारा केंद्राची माहिती, त्यामधील व्यक्तींचे नियोजन, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, नियंत्रण कक्षाचे क्रमांक यांचा समावेश असावा. त्याचबरोबर जनावरांच्या चारा पुरवठ्याबाबत एजन्सी नेमण्याबाबत नियोजन करावे. रेस्क्यू फोर्सना आताच गावे वाटून द्यावीत, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया हे आजार उद्भवू नयेत यासाठी कोरडा दिवस पाळणे, फवारणी करणे यांबाबत गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्याधिकारी यांनी सतर्क राहावे, असा कोणताही आजार उद्भवल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी बजावले.

Web Title: Screening of people coming from outside districts: Collector Desai; Have a facility at the segregation center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.