पेच कायम; मंडई ‘बंद’च
By admin | Published: March 7, 2017 12:12 AM2017-03-07T00:12:55+5:302017-03-07T00:12:55+5:30
बैठक निष्फळ ; ‘अडती’च्या मुद्द्यावर दुकानदार-व्यापारी दोघेही ठाम
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील अडत दुकानदार व व्यापाऱ्यांच्यातील अडत देण्यावरून निर्माण झालेला पेच सहाव्या दिवशीही कायम आहे. दोन्ही घटकांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी कपिलतीर्थ मार्केटमध्ये झाली; पण व्यापारी अडत न देण्यावर ठामच असल्याने बैठक निष्फळ ठरली.
भाजीपाला खरेदीवर ६ टक्के अडत देण्यास विरोध करीत व्यापाऱ्यांनी बुधवार (दि. १) पासून बाजार समितीतून माल खरेदी बंद केली आहे. कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील सुमारे एक हजाराहून अधिक व्यापारी या संपात उतरल्याने शहरासह शेजारील गावांतील आठवडी बाजारातील व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजार समितीत साधारणत: रोज दोन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होते, पण व्यापाऱ्यांच्या संपापासून उलाढाल थंडावली आहे. स्थानिक व्यापारी जरी ४० टक्के माल उचलत असले तरी बाहेरील कोणीही माल खरेदी करू नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केल्याने भाजी खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. अडत व व्यापाऱ्यांचेच यामुळे नुकसान होत नाही तर समितीलाही ‘सेस’च्या माध्यमातून रोज तीस हजारांचा फटका बसत आहे.
गेले दोन दिवस अडत दुकानदारांनी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रविवारी चर्चेदरम्यानच व्यापाऱ्याला जबर मारहाण झाल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. सोमवारी सकाळी भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जमीर बागवान, संदीप मराठे, चिंकू भोसले, अब्दुल बागवान, रहिम बागवान, जाफर बागवान या अडत्यांनी पुढाकार घेत कपिलतीर्थ मार्केटमध्ये चर्चेचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या धोरणानुसारच अडत घेत आहे, त्यात बदल करण्याचा अधिकार ना बाजार समितीला आहे ना अडत्यांना आहे. त्यामुळे आपण सामूहिक मागणी सरकारच्या पातळीवर करूया, असे आवाहन जमीर बागवान यांनी केले. अडते, व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. अनेकांची हातावरील पोटे आहेत. त्यामुळे उपाशीपोटी लढा देता येणार नाही. खरेदी सुरू करून सरकारशी लढाई करूया, असे आवाहन बागवान यांनी केले; पण ‘अडत देणार नाहीच,’ यावर व्यापारी ठाम राहिल्याने बैठक निष्फळ ठरली. यावेळी व्यापारी संघटनेचे राजू जाधव, विलास मेढे, राजू लायकर, पिंटू आंबेकर, रियाज बागवान, महेबूब बागवान उपस्थित होते.
बाजार समिती : नवीन लायसन्स देणार
व्यापारी जर आडमुठे धोरण घेणार असतील तर बाजार समितीला पावले उचलावी लागतील. शहरासह ग्रामीण भागातील भाजीपाला व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना समिती लायसन्स देणार आहे.
एका दिवसात लायसन्स दिले जाईल. त्यांनी माल खरेदी करून शहरासह ग्रामीण भागात विक्री करावा, असे आवाहन सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांनी केले.