५ नोव्हेंबरपासून धुराडी पेटणार
By admin | Published: October 19, 2016 12:31 AM2016-10-19T00:31:36+5:302016-10-19T00:31:36+5:30
कोंडी फुटणार : मंत्री समितीच्या बैठकीत आज निर्णय
कोल्हापूर : साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास सरकारकडून ‘हिरवा कंदील’ मिळणार आहे. याबाबत आज, बुधवारी होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस निर्माण झालेली हंगामाची कोंडी फुटणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत १ डिसेंबरपासून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. उसाच्या कमतरतेचे कारण पुढे करत हंगाम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा फटका प. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहे. कर्नाटकातील कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जाण्याची अधिक आहे. परिणामी, महाराष्ट्रातील कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हंगाम सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांची होती. याबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा मंत्री समितीची बैठक बोलावून बदल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज दुपारी एक वाजता मुंबईत मंत्री समितीची बैठक होत आहे.
१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी आहे, त्यामुळे ५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कारखानदारांसह शेतकरी संघटनेची आहे. त्यामुळे मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार हे निश्चित आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस हंगामाबाबत झालेली कोंडी फुटणार आहे. (प्रतिनिधी)
मंत्री समितीच्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत.