प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तरच शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:42+5:302021-04-24T04:25:42+5:30
कोल्हापूर : खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करून त्यांच्या हातावर १४ दिवस गृहविलगीकरणाचा शिक्का मारण्याचे आदेश जिल्हा ...
कोल्हापूर : खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अँटिजन चाचणी करून त्यांच्या हातावर १४ दिवस गृहविलगीकरणाचा शिक्का मारण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिला. त्यावर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शुक्रवारी प्रवाशांची आणि विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांच्या हातावर शिक्का मारून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात येत होते.
मध्यवर्ती बसस्थानकामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, आदी परजिल्ह्यांतून येणाऱ्या आणि त्या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या एस.टी. बसची सेवा बंद झाली आहे. जिल्ह्यात एसटी विभागाची केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. या स्थानक परिसरात अँटिजन चाचणी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली असल्याची माहिती एसटीचे कोल्हापूर विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे येणाऱ्या प्रवाशांच्या अँटिजन चाचणी करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कार्यन्वित झाली आहे. केवळ चार रेल्वे सुरू आहेत. त्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अगदी कमी असल्याचे स्थानक प्रबंधक ए. आय. फर्नांडीस यांनी सांगितले.