दुकानगाळ्यांच्या भाडे वसुलीसाठी ८ गाळे सील
By admin | Published: February 12, 2016 12:54 AM2016-02-12T00:54:57+5:302016-02-12T00:55:22+5:30
अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली.
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या दुकानगाळ्यांची भाडे वसुली मोहीम पालिकेने हाती घेतली असून, गुरुवारी १५ लाख रुपयांच्या भाडे वसुलीसाठी आठ गाळ्यांना सील ठोकण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस व रिपब्लिकन पक्ष यांचेही गाळे असल्याने येथील राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा झाला आहे.शहरामधील विविध परिसरांमध्ये नगरपालिकेकडून व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारच्या व्यवसायासाठी गाळे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही आपल्या कार्यालयांसाठी गाळे भाड्याने घेतले आहेत. यापैकी काही गाळेधारकांकडे भाडे वसुलीसाठी वारंवार मागणी करूनसुद्धा भाडे किंवा त्यांचा घरफाळा नगरपालिकेकडे भरण्यात आला नाही.सध्या घरफाळा वसुलीची मोहीम गतीने सुरू असून, विविध ठिकाणच्या गाळेधारकांकडून थकीत असलेल्या भाड्याची रक्कमसुद्धा वसूल करण्याची मोहीम आता पालिकेने हाती घेतली आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दिली. सुरुवातीला एकूण नऊ गाळ्यांवर कारवाई करून ते सील करण्यात आहे. त्यापैकी एका गाळेधारकाने आपली रक्कम भरल्यामुळे त्याला सोडून अन्य आठ गाळे त्यांच्याकडील सुमारे १५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी सील करण्यात आले. त्यामध्ये राजाराम स्टेडियम इमारतीमधील राष्ट्रवादी कॉँग्रेसचा, तसेच रिपब्लिकन पक्षाचासुद्धा गाळा पालिका कर्मचाऱ्यांनी सील केला. (प्रतिनिधी)
थकबाकी आणि
दोन ‘रवी’
गाळे सील करण्याच्या कारवाईमध्ये राजकीय पक्षांचे दिग्गज अडकले आहेत. त्यांच्याकडे घरफाळा, तसेच थकीत भाडे आणि डिपॉझिट यांची थकबाकी असल्याचे समजते. अशा कारवाईमध्ये दोन ‘रवीं’चा अंतर्भाव असल्याची जोरदार चर्चा आहे.