संजीवनी अभियानाद्वारे कोरोनाबाधितांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:03+5:302021-05-29T04:19:03+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाला रोखण्याकरिता शहरातील संजीवनी अभियानावर सर्वाधिक जोर दिला असून, त्याला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहेच, ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाला रोखण्याकरिता शहरातील संजीवनी अभियानावर सर्वाधिक जोर दिला असून, त्याला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहेच, शिवाय अभियानाचा हेतूही सफल होताना पाहायला मिळत आहे. ज्या व्यक्ती कोरोनाबाधित आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांना समाजापासून कुटुंबापासून दूर केले जात असल्याने संसर्गाचा धोका कमी झाला आहे.
या अभियानाचे चांगले परिणाम होताना दिसत असून, आणखी संपूर्ण शहरातील घराघरातून महापालिकेची पथके जातील आणि छुप्या कोरोनाग्रस्तांना समाजापासून अलगीकरण करतील तेव्हा नक्की संसर्गाला आळा बसेल, असा आशावाद प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. बलकवडे यांनी स्वत: यात पुढाकार घेतला असून, त्यांनी शुक्रवारी साईक्स एक्स्टेशन परिसरातील महावीर, महालक्ष्मी, माधवी अपार्टमेंटस्, पटेल बिल्डिंग येथे भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत संजीवनी अभियानाचे महत्त्व सांगितले.
यावेळी त्यांनी काही नागरिकांची सहा मिनिटे वॉक टेस्टसुध्दा घेतली. सहा मिनिटानंतर रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण याची तपासणी केली. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, डॉ. विजय पाटील, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, माजी उपमहापौर संजय मोहिते उपस्थित होते.
संजीवनी अभियानाअंतर्गत शक्रवारी ५९९४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये व्याधीग्रस्त ६९४ नागरिकांपैकी २७ पॉझिटिव्ह व ६६७ निगेटिव्ह आढळून आले. दिवसभरात ठिकठिकाणी ५६९६ व्याधीग्रस्त नागरिकांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोविडसदृश लक्षणे असणारे ६३ नागरिक आढळून आले; तर ७३६ व्याधीग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
महापालिकेच्या १५० वैद्यकीय पथकांद्वारे दिलबहार तालीम, लाड चौक, शहाजी वसाहत, शाहूपुरी, राजारामपुरी, दौलतनगर, दुधाळी, कागदी गल्ली, जुना बुधवार, हळदकर हॉल, कसबा बावडा, लाईन बझार, शिवाजी पार्क, नागाळा पार्क, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, रुईकर कॉलनी, जरगनगर, अंबाई टँक, मीरा भक्ती, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, कारंडे मळा, मार्केट यार्ड, नागाळा पार्क, रमणमळा, गंजी गल्ली, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, प्रथमेशनगर, सुर्वेनगर या परिसरात अभियान राबविण्यात आले.