रामाणे कुटुंबीयांविरोधात तुल्यबळ उमेदवाराचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:11+5:302021-03-05T04:23:11+5:30
अमर पाटील : कळंबा : सर्वांत हायव्होलटेज लढत असणारा प्रभाग क्रमांक ७७, शासकीय मध्यवर्ती कारागृह हा प्रभाग यंदाच्या पालिका ...
अमर पाटील : कळंबा : सर्वांत हायव्होलटेज लढत असणारा प्रभाग क्रमांक ७७, शासकीय मध्यवर्ती कारागृह हा प्रभाग यंदाच्या पालिका निवडणुकीत सर्वसाधारण झाल्याने यंदा या प्रभागात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. या प्रभागातून पालिकेत जाण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. विशेष म्हणजे गेली २० वर्षे रामाणे कुटुंबीयांनी या प्रभागावर निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. त्यामुळे यंदा रामाणे कुटुंबीयांना खिंडीत रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे. २००५च्या निवडणुकीत मधुकर रामाने आणि दिनकर पाटील या दोन मातब्बर अपक्षीय उमेदवारांत लढत झाली होती. यात मधुकर रामाणे विजयी झाले होते. २०१०च्या निवडणुकीत मधुकर रामाणे अपक्ष रिंगणात उतरले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या संदीप पाटील यांचा पराभव केला होता. गतवेळी २०१५च्या निवडणुकीत हा प्रभाग इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाला होता. त्यावेळी चार प्रमुख पक्षांच्या महिला उमेदवार रिंगणात होत्या. मात्र खरी लढत काँग्रेसच्या अश्विनी रामाणेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी लोळगे यांच्यात होऊन काँग्रेसच्या अश्विनी रामाणे १८१ मतांनी निवडून आल्या होत्या. भाजपच्या सुवर्णराधा साळोखे यांनाही चांगली मते घेतली होती. सध्या या प्रभागात काँग्रेसकडून माजी नगरसेवक मधुकर रामाने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. दुसरीकडे सुहास देशपांडे, संदीप पाटील, नितीन मस्के, रणजित साळोखे, चिन्मय सासणे, विक्रम पाटील, अभिजित कदम, तानाजी जाधव, फिरोज पठाण यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसचा हक्काच्या मतदारसंघात रामाणे कुटुंबीयांविरुद्ध तुल्यबळ तगडा उमेदवार देताना अन्य पक्षांतील नेत्यांचा कस लागणार आहे. एकंदरीत काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याचे तगडे आव्हान अन्य पक्षांसमोर आहे.
प्रभाग ७७, शासकीय मध्यवर्ती कारागृह. विद्यमान नगरसेविका-अश्विनी रामाणे. आताचे आरक्षण-सर्वसाधारण गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : अश्विनी रामाने (काँग्रेस)-११३२, अश्विनी लोळगे (राष्ट्रवादी काँग्रेस) ९५१, सुवर्णराधा साळोखे (भाजप )६७५, छाया मस्के ( शिवसेना ) २५. प्रभागात झालेली कामे १) प्रभागातील ड्रेनेज व पाणीप्रश्न बहुतांश मार्गी, २) निर्मिती चौक ते कळंबा जेल अडीच कोटींचा साठफुटी रिंगरोड विकसित केला, ३) संपूर्ण प्रभागात एलइडी पथदिवे, ४) पाच खुल्या आरक्षित जागा विविध कारणांस्तव विकसित, ५) अंतर्गत रस्ते, कचरा उठाव, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांश मार्गी, ६) ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक हॉल. ७) कोरोना काळात जनसंपर्क व घरोघरी आरोग्यसेवा, ८) मूलभूत नागरी समस्यांचे निर्मूलन.
शिल्लक असलेली कामे : १) ड्रेनेजची कामे प्रलंबित, २) अंतर्गत रस्ते व कचरा उठावाची समस्या, ३) सार्वजनिक स्वच्छतागृहांची समस्या, ४) निर्मिती चौकात किरकोळ अपघात व वाहतुकीचा बोजवारा, ५) पावसाळ्यात नागरी वस्तीत शिरणारे पाणी, ६) आरक्षित जागा अविकसित, ७) भाजीमंडई विकसित होणे गरजेचे.
कोट : गेल्या पाच वर्षांत प्रभागात सहा कोटींची विकासकामे पूर्णत्वास नेऊन बहुतांश प्रलंबित मूलभूत समस्या मार्गी लावले. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्याने निवडून येताच पहिल्यांदाच देशात सर्वांत कमी वयात महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळाली. या कालावधीत शहराचे बहुतांश प्रश्न सोडविले.
अश्विनी रामाणे, नगरसेविका