‘खादी ग्रामोद्योग’ लाभार्थींच्या शोधात
By admin | Published: October 9, 2015 12:15 AM2015-10-09T00:15:09+5:302015-10-09T00:45:21+5:30
विशेष घटक योजना : मातंग, दलित, बुरूड, चर्मकार, सुतार यांना लाभ
कृष्णा सावंत --पेरणोली--आजरा तालुक्यातील सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या खादी ग्रामोद्योग संस्थेला विशेष घटक योजनेसाठी लाभार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने एक महिन्यापासून संस्था लाभार्थ्यांच्या शोधात आहे.
सहकार तत्त्वावर चालणारी, पण शासनाचे नियंत्रण असणाऱ्या खादी ग्रामोद्योग संस्थेकडे प्रक्रिया करणाऱ्या लघुउद्योगासाठी विविध योजना आहेत. त्यापैकी दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांसाठी विशेष घटक योजनेच्या माध्यमातून लाभार्थी निवड केली जाते. त्यापैकी मातंग, दलित, बुरुड, चर्मकार, सुतार अशा दुर्लक्षित घटकातील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो.
एप्रिल ते मार्च या कालावधीत ५० टक्के अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. २० हजार रुपये कर्जमर्यादा आहे. त्यापैकी १० हजार रुपये अनुदान बँक खात्यावर जमा केले जातात. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत संबंधित लाभार्थ्यांचे खाते असणे आवश्यक आहे. पाच वर्षे परतफेड करण्याची मुदत आहे.
समाजातील मागासलेला वंचित घटक आर्थिकदृष्ट्या लघुउद्योगाच्या माध्यमातून सक्षम व्हावा व त्याच्या रोजगाराला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश आहे. तालुक्यातील दुर्लक्षित घटकातील दारिद्र्यरेषेखालील बहुतांशी लाभार्थ्यांनी यापूर्वी योजनांचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. किमान २० प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. प्रस्ताव न आल्यास अनुदान परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र व गरजू लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे. वेतबांबू, झाडू, दोरी व्यवसाय, टेलरिंग, गवंडी, सुतार, इलेक्ट्रिक, मिरची कांडप, आदी व्यवसायासाठी लाभ दिला जातो.
दारिद्र्यरेषेखालील गरजू व पात्र लाभार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. प्रस्तावाच्या अनुक्रमणिकेनुसार मंजुरीसाठी प्राधान्य देण्यात येईल.
- के. एस. जाधव, सचिव, खादी ग्रामोद्योग, आजरा.