Kolhapur: ए.एस. ट्रेडर्स फसवणुकीतील संशयितांच्या मालमत्तांचा शोध सुरू, पोलिस अधीक्षकांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 11:54 AM2023-06-28T11:54:58+5:302023-06-28T11:55:30+5:30

अटकेपेक्षा मालमत्ता जप्तीस प्राधान्य, विकलेल्या मालमत्ताही जप्त होणार

Search of properties of A.S.traders fraud suspects underway, informs Superintendent of Police | Kolhapur: ए.एस. ट्रेडर्स फसवणुकीतील संशयितांच्या मालमत्तांचा शोध सुरू, पोलिस अधीक्षकांची माहिती 

Kolhapur: ए.एस. ट्रेडर्स फसवणुकीतील संशयितांच्या मालमत्तांचा शोध सुरू, पोलिस अधीक्षकांची माहिती 

googlenewsNext

कोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ए.एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे काम सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. संचालक आणि एजंटनी विक्री केलेल्या मालमत्ताही जप्त करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी (दि.२७) पत्रकारांशी बोलताना दिली.

ए.एस. ट्रेडर्स आणि तिच्या संलग्न कंपन्यांनी गुंतवणूकदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. गुन्हा दाखल असलेल्या २७ संशयितांपैकी केवळ एका संशयिताला पोलिसांनी आजवर अटक केली. इतर संशयितांसह एजंटांनाही अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, अशी मागणी गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक पंडित यांच्याकडे केली होती.

मात्र, संचालक आणि एजंटांच्या अटकेपेक्षा त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यास प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली. गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. संशयितांनी त्यांच्याकडील मालमत्तांची विक्री केली तरीही त्यावर जप्तीची कारवाई होणार असल्याचे पंडित यांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयात आज सुनावणी

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्यासह १४ संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.

६२ एजंटांची यादी

ए.एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने अधीक्षक पंडित यांना निवेदन देऊन ए.एस. मधील एजंटांवरही करवाई करण्याची मागणी केली. लाखो रुपयांचे कमिशन मिळवून अनेक एजंट कोट्यधीश झाले आहेत. ते मालमत्तांची विक्री करण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी कृती समितीने केली आहे. ६२ एजंटांची यादी कृती समितीने पोलिस अधीक्षकांना दिली.

तपास अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी प्राथमिक तपास केला. इंगवले यांनी जाणीवपूर्वक तपासात त्रुटी ठेवल्या, विलंब लावला आणि संशयितांच्या अटकेसाठी टाळाटाळ केली. गुन्हे दाखल असलेल्या काही संशयितांशी त्यांनी आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोपही कृती समितीने केला असून, त्यांच्या चौकशीची मागणी निवेदनाद्वारे केली.

Web Title: Search of properties of A.S.traders fraud suspects underway, informs Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.