लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारच्या कोल्हापुरातील बंगल्याची झडती, महत्वाची कागदपत्रे जप्त
By भीमगोंड देसाई | Published: November 1, 2022 06:29 PM2022-11-01T18:29:07+5:302022-11-01T18:29:41+5:30
ग्लोबल टीचर डिसले गुरुजी यांच्यावरील कारवाईनंतर आले होते चर्चेत
कोल्हापूर : लाचप्रकरणी सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्या पाचगाव (ता.करवीर) येथील अलिशान बंगल्याची लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) सोमवारी रात्री उशिरा झाडाझडती घेतली. यावेळी पोलीसांच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे सापडली आहेत. त्यांचा पंचनामा करून हा दस्तऐवज सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवण्यात आला.
लोहार यांचे मूळ गाव शाहूवाडी तालुक्यातील आहे. ते येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना प्रचंड वादग्रस्त ठरले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. सोलापुरात शिक्षणाधिकारी म्हणून काम करतानाही त्यांचा कारभार चर्चेत राहिला. काल, सोमवारी दुपारी त्यांना २५ हजारांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. त्यानंतर त्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली आहे.
सोलापूर एसीबीच्या सुचनेनुसार कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार व पथकाने पाचगाव येथील लोहारच्या बंगल्याची रात्री उशिरा झाडाझडती घेतली. बंगल्यातील तिजोरी, कपाटातील फायली, काही कागदपत्रे, खरेदीच्या पावत्या पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. जप्त केलेली कागदपत्रे व पंचनाम्याचा अहवाल सोलापूर एसीबीकडे पाठवला आहे. दोन मजली बंगल्याची तासभर झडती सुरु होती. बंगल्यासमोर पोलीस वाहने थांबल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चर्चेचा विषय सुरू होता.