गुगल मॅपवरून रस्ता शोधायला लागला, ट्रक थेट घरातच घुसला; बालिका जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 06:57 PM2022-12-02T18:57:58+5:302022-12-02T18:58:18+5:30
ट्रकचालक गुगल मॅपच्या आधारेच वाहन चालवित होता
भादवण : गुगल मॅपच्या साहाय्याने रस्ता शोधत पशुखाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकने घराला जोराची धडक दिली. या धडकेत घराची भिंत कोसळून बालिका जखमी झाली. ऋतुजा रमेश खुळे (वय १०) असे जखमी बालिकेचे नाव आहे. हा अपघात काल, गुरुवारी सकाळच्या सुमारास भादवण येथे घडला.
गुगल मॅपच्या आधारे गडहिंग्लज येथून ट्रक सकाळी पेद्रेवाडीकडे जाण्यासाठी निघाला होता. भादवण गावात सकाळी सातच्या सुमारास ट्रक आला. यावेळी ट्रकचालक गुगल मॅपच्या आधारेच वाहन चालवित होता. मात्र, त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने दशरथ खुळे यांच्या घराच्या भिंतीला जोराची धडक दिली.
धडक दिलेल्या भिंतीलगत घरातच्या आतील बाजूस असणाऱ्या खाटेवर ऋतुजा ही झोपली होती. काही कळायच्या आतच तिच्या अंगावर दगड, विटा व माती पडली. ग्रामस्थांनी तत्काळ ऋतुजाच्या अंगावरील पडलेले साहित्य काढले. ऋतुजाला मार लागला असून ती जखमी झाली आहे.