आरटीई अंतर्गत दुसऱ्या प्रवेश फेरीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 05:50 PM2019-06-15T17:50:39+5:302019-06-15T17:51:19+5:30
आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के राखीव कोट्यातून प्रवेश देण्याची दुसरी फेरी शुक्रवारपासून सुरू झाली. प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून लॉटरी काढण्यात आली.
कोल्हापूर : आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के राखीव कोट्यातून प्रवेश देण्याची दुसरी फेरी शुक्रवारपासून सुरू झाली. प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून लॉटरी काढण्यात आली.
सोमवारी (दि. १७) एनआयसी सेंटरकडून निवड झालेल्या बालकांची यादी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे, तसेच पालकांनाही एसएमएस केले जाणार आहेत. पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता, पोर्टलवर जाऊन प्रवेश निश्चितीची खातरजमा करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे.
आरटीई अतंर्गत यापूर्वी पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाली आहे. त्याचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर आता दुसरी फेरी आजपासून सुरूहोत आहे. या फेरीत पालकांनी प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे, तसे न केल्यास त्यांना पुढील फेरीमध्ये संधी दिली जाणार नाही, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पोर्टलवर जाऊन आपला भरलेला फॉर्म युजर आयडी व पासवर्ड टाकून ओपन करावा. त्यामध्ये अॅडमिट कार्ड या टॅबवर क्लिक करून त्याची प्रिंंट काढावी. ही प्रिंट पालकांनी प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन शहरी भागासाठी महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी पंचायत समितीतील शिक्षण विभागात जमा करायची आहे. तेथील शाळा पडताळणी समितीकडे आपले अॅडमिट कार्ड व कागदपत्रे प्रमाणीत करून घ्यावयाची आहेत.
विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असल्याबाबतचे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीने घेऊन त्या पत्राची प्रत संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पालकांनी शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे न तपासता परस्पर शाळेत दिल्यास पाल्यास प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पडताळणी समितीच्या शिफारशीशिवाय कोणत्याही शाळांनी प्रवेश द्यायचा नाही, असे झाल्यास निवड रद्द केली जाईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.