जानेवारी, फेब्रुवारीत दुसरी कोरोना लाट येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 10:58 AM2020-11-12T10:58:15+5:302020-11-12T10:59:17+5:30
corona virus, kolhapurnews दिवाळीच्या खरेदीसाठी जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र असताना जानेवारी, फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरी कोरोना लाट येण्याची शक्यता सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे याबाबत आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व आरोग्य यंत्रणाना सहापानी पत्र लिहून सूचना केल्या आहेत.
कोल्हापूर : दिवाळीच्या खरेदीसाठी जनता रस्त्यावर उतरल्याचे चित्र असताना जानेवारी, फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरी कोरोना लाट येण्याची शक्यता सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे याबाबत आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व आरोग्य यंत्रणाना सहापानी पत्र लिहून सूचना केल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, युरोपियन देशांमध्ये पुन्हा दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सध्या ज्या प्रयोगशाळा कार्यरत आहे त्या दिलेल्या सूचनांप्रमाणे सक्षमपणे कार्यरत ठेवाव्यात. फ्लूसदृश आजाराचे नियमित सर्वेक्षण करावे, त्यासाठी गृहभेटी आणि कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. सध्या शहरी आणि ग्रामीण भागातील कोविडचे रुग्ण सध्या कमी होत आहेत. अशा परिस्थितीत कोविड आणि नॉन कोविड रुग्णसेवेचा पुरेसा ताळमेळ ठेवण्यासाठी आणि जनतेला सर्वप्रकारच्या रुग्णसेवा सुरळीतरित्या मिळण्याकरिता रुग्ण उपचार व्यवस्थेसंदर्भात नियोजन करावे.
प्रत्येक जिल्ह्याने आणि महापालिकेने आवश्यक असणारी यंत्रणा, औषधे, ऑक्सिजन याचा पंधरा दिवसांचा बफर स्टॉक ठेवावा, असे बजावले आहे. गरजेची ५० टक्के औषधे उपलब्ध असतील याची खातरजमा करण्याचेही आदेश आहेत. गंभीर रुग्णांना संदर्भसेवा, अतिजोखमीच्या व्यक्तींची जपणूक, विविध समित्यांची स्थापना, क्षमता संवर्धन आणि प्रशिक्षण आणि प्रबोधन यावर भर द्या, असे सुचविले आहे.
सुपर स्प्रेडर्सचे सर्वेक्षण करा
ज्या व्यक्तींचा व्यवसाय व अन्य कामांच्या निमित्ताने अधिक जनसंपर्क येतो, अशा सुपर स्प्रेडर्सचे सातत्याने सर्वेक्षण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. अशा व्यक्तींच्या माध्यमातून कोविडचा प्रसार जलदगतीने होऊ शकतो. त्यामुुळे छोटे व्यावसायिक, किराणा दुकानदार, भाजीवाले, पदपथावरील विक्रेते यांच्यासह घरी सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.