पंचगंगा परिक्रमेचा दुसरा दिवसही अलोट गर्दीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:51+5:302021-09-03T04:23:51+5:30

कोल्हापूर : सरकारकडून मदतीसाठी झालेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ नृसिंहवाडीत जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या पूरग्रस्तांनी गुरुवारी दिवसभर शिये ते चोकाक असा प्रवास ...

The second day of Panchganga Parikrama was also very crowded | पंचगंगा परिक्रमेचा दुसरा दिवसही अलोट गर्दीचा

पंचगंगा परिक्रमेचा दुसरा दिवसही अलोट गर्दीचा

Next

कोल्हापूर : सरकारकडून मदतीसाठी झालेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ नृसिंहवाडीत जलसमाधी घेण्यासाठी निघालेल्या पूरग्रस्तांनी गुरुवारी दिवसभर शिये ते चोकाक असा प्रवास करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ऊन, वारा, पाऊस झेलतच पायी निघालेल्या या परिक्रमेचे सारथ्य स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी करत आहेत. मार्गावरील गावातून अलोट प्रतिसाद मिळत असून जथ्ये पुढे मार्गस्थ होत असल्याचे चित्र होते. गावागावांत सभा घेऊन वातावरण तापवले जात आहे.

बुधवारी सकाळी प्रयाग चिखली येथून पंचगंगेच्या संगमावरून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांची पंचगंगा परिक्रमा सुरू झाली आहे. ५ सप्टेबरला नृसिंहवाडीत सामूहिक जलसमाधी घेण्याची घोषणा करत ही पायी परिक्रमा सुरू झाली. शेट्टी यांच्यासमवेत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, वैभव कांबळे, सागर शंभूशेटे, सुनीता अपराज हे आघाडीवर त्यांच्यासमवेत चालत आहेत.

गुरुवारी सकाळी शिये येथून सुरुवात झालेली परिक्रमा शिये फाट्यावरून शिरोली येथून हालोंडीत आली. येथे जेवण करून सभाही झाली. शेट्टी यांनी पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरून सरकारवर टीकेचे आसूड ओढले. दुपारी हेर्ले गावातून फेरी मारून चोकाक येथे मुक्काम केला. आज शुक्रवारी सकाळी चोकाकमधून निघून चिंचवाड येथे जेवणासाठी परिक्रमा थांबणार आहे. वसगडेतून पुढे जात पट्टणकोडोलीत मुक्काम होणार आहे.

या परिक्रमेच्या निमित्ताने शेट्टी स्वत: चालत पूरग्रस्त गावातील नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. पेटून उठल्याशिवाय सरकारकडून छदामही मिळणार नाही, हे सभांमधून सांगितले जात आहे. परिक्रमेत शेतकरी, तरुण, महिला यांच्यासमवेत स्केटींगपटू देखील शेट्टी यांच्यासोबत चालत आहेत.

Web Title: The second day of Panchganga Parikrama was also very crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.