सलग दुसऱ्या दिवशी दहा लाखांवर दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:04+5:302021-06-22T04:18:04+5:30
कोल्हापूर : कोविडचा वाढता प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी दिवसभरात १० लाख ७१ हजार ...
कोल्हापूर : कोविडचा वाढता प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी दिवसभरात १० लाख ७१ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला तर ४७५ वाहने जप्त केली.
गेले कित्येक दिवसांपासून प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वारंवार सूचना देऊनही नागरिकांचे घराबाहेर पडणे थांबत नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाने कारवाईचा बडगा जोरदारपणे उगारला आहे. दिवसभरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ हजार ७१८ जणांकडून ५ लाख ५२ हजार ९९०, तर मास्क न घालणाऱ्या २ हजार ६१५ जणांकडून ३ लाख ९९ हजारांचा दंड वसूल केला. यासह निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल १४३ आस्थापनांकडून १ लाख १९ हजार २०० रुपयांचा दंड असा एकूण १० लाख ७१ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. आजच्या कारवाईत ११ जणांवर गुन्हेही दाखल केले तर ४७५ वाहनेही जप्त केली. ही कारवाई आज, मंगळवारीही तितक्याच तीव्र स्वरुपात केली जाणार आहे तरी घरी राहून विनाकारण फिरू नये, अशी विनंती जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आली आहे.