दुसऱ्या माळेलाच मंदिरात गर्दी

By admin | Published: October 15, 2015 12:01 AM2015-10-15T00:01:31+5:302015-10-15T00:44:17+5:30

अंबाबाई धन-धान्य लक्ष्मीरूपात : तुळजाभवानी देवीची सिंहवाहिनी रूपात पूजा

The second floor is just crowded in the temple | दुसऱ्या माळेलाच मंदिरात गर्दी

दुसऱ्या माळेलाच मंदिरात गर्दी

Next

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला बुधवारी करवीरनिवासिनी अंबाबाईची धन-धान्य लक्ष्मीरूपात पूजा बांधण्यात आली. तर तुळजाभवानी देवीची सिंहवाहिनी रूपात पूजा बांधण्यात आली. छत्रपती घराण्याच्या युवराज्ञी संयोगीताराजे यांनी भवानीदेवीची पूजा बांधली. नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील यांच्या हस्ते अंबाबाईचा शासकीय अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर देवीची धन-धान्य लक्ष्मीरूपात पूजा बांधण्यात आली. ‘सकलवरदायिन्यै श्री धनधान्यलक्ष्म्यै नम:। धनलक्ष्मि नमस्तेस्तु सर्वदारिद्र्यनाशिनी, धनं देहि श्रियं देहि सर्वकामांश्च देहि मे।।’ अष्टलक्ष्मीतील दुसरी देवता आहे श्री धनधान्य लक्ष्मी. ही देवता भक्तांच्या दारिद्र्याचा नाश करून गजान्तलक्ष्मी व अन्नधान्याची समृद्धी करते. त्यानुसार धन-धान्य लाभासाठी या देवतेची उपासना केली जाते. ही पूजा श्रीपूजक सिद्धार्थ देशपांडे, दीपक कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, आलोक कुलकर्णी, अनिरुद्ध कुलकर्णी यांनी बांधली. विविध संस्थांनी मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. रात्री साडेनऊ वाजता पालखी काढण्यात आली. तुळजाभवानी मंदिरात भवानीदेवीची सिंहवाहिनी रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याची कुलदेवता आहे. देवीची पूजा स्वत: युवराज्ञी संयोगीताराजे यांनी बांधली .

पुण्याच्या महिलांची गर्दी
बुधवारी दुपारी पुण्यातील महिला अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्या होत्या. महिला भाविकांच्या जवळपास तीस लक्झरी बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या. या महिलांमुळे दुपारी अंबाबाई मंदिरात अचानक गर्दी झाली व दर्शनरांगा फुलून गेल्या.

दोन मुले पालकांकडे सुखरूप
दुपारी अंबाबाई दर्शनासाठी आलेल्या भाविकांची दोन मुले पालकांपासून चुकली होती. एक मुलगा सोलापूरचा, तर दुसरा माळशिरस येथील होता. देवस्थान समितीने आवाहन करून या मुलांना पालकांकडे सुखरूप पोहोचवले.

लॉकर्सऐवजी माणसं
परस्थ भाविकांच्या बॅगा ठेवण्यासाठी शिर्डीहून लॉकर्स मागविण्यात येणार होते. मात्र, त्याऐवजी शिर्डी येथील काही माणसे यासाठी आली. त्यांना ‘शेतकरी बझार’च्या बाहेर जागा देण्यात आली. ते भाविकांकडून बॅगा स्वीकारून त्यांना कुपन देऊन बॅगा सांभाळत आहेत.


पार्किंगसाठी मेन राजाराम, शिवाजी स्टेडियम खुले
अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बुधवारपासून मेन राजाराम हायस्कूलचे मैदान आणि शिवाजी स्टेडियम खुले करण्यात आले. मेन राजाराम हायस्कूलचे मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्याने दुपारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा आणि जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला. शिवाजी स्टेडियमवर क्रीडा विभागाचे सामने सुरू होते. त्यामुळे ते पार्किंगसाठी मिळण्यात अडचणी होत्या. मात्र, पोलीस अधीक्षकांच्याच पुढाकाराने या सामन्यांसाठी पोलिसांचे फुटबॉल मैदान देऊन स्टेडियम पार्किंगसाठी खुले करण्यात आले आहे. नागरिकांनी या पार्किंगचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक (वाहतूक) आर. आर. पाटील यांनी केले आहे.

अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देवस्थान समितीतर्फे विकत लाडू प्रसाद दिला जातो.
या लाडू प्रसादाचा ठेका मंगळवारी संपल्यानंतर बुधवारी तो सिद्धार्थ मागासवर्गीय संस्थेला देण्यात आला.
मात्र, अचानक ठेका बदलल्याने लाडू संपले; त्यामुळे काही काळ प्रसादविक्री बंद ठेवण्यात आली. संध्याकाळनंतर प्रसाद पूर्ववत सुरू झाला.

Web Title: The second floor is just crowded in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.