महाडिक-मंडलिक यांची दुसरी पिढी २५ वर्षांनी एकत्र, पक्षीय पेक्षा सोयीच्या राजकारणावर जोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:54 PM2024-04-12T12:54:11+5:302024-04-12T13:01:51+5:30
महाडिक-मंडलिक कधी सोयीने एकत्र आले तर कधी एकमेकांविरुद्ध लढले
कोल्हापूर : नव्वदच्या दशकात महाडिक-मंडलिक जोडीला जिल्ह्याच्या राजकारणात मसल आणि मनीपॉवर म्हणून ओळखले जात होते. या जोडगोळीने जिल्ह्यातील अनेक संस्थांवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केल्याने मूळ काँग्रेस नेते हतबल झाले, अनेक वर्षे नेतृत्व करूनही आपले काही चालत नाही म्हटल्यावर त्यांनी ही जोडगोळी फोडण्याचे बरेच प्रयत्न केले. त्याला यशही आले. महाडिक-मंडलिक वेगळे झाले. आता त्यांच्या घराण्यातील दुसरी पिढी तब्बल २५ वर्षांनी एकत्र येऊन राजकारण करत आहे. कोल्हापूरची जनता त्यांना साथ देते की नाही हे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांची कोल्हापूरच्या राजकारणाची सुरुवात १९९० च्या सुमारास कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून झाली. जिल्ह्याच्या राजकारणाचे महापालिका हे प्रवेद्वार असल्याने महाडिक यांनी ताकद लावून महापालिकेत सत्ता प्रस्थापित केली. भिकशेठ पाटील यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला महापौर केल्याने त्यावेळी शहरवासीयांची महाडिक यांनी सहानुभूती मिळाली. तेथून पुढे महाडिक यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संघ, केडीसीसी बँक ताब्यात घेतल्या.
महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाला तत्कालिन आमदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे सहकार्य मिळाले. आपण दोघे एकत्र राहिलो तर जिल्ह्यात आपण नेते होऊ शकतो असा महाडिक-मंडलिक या दोघांना विश्वास होता त्यामुळे एकमेकास सहाय करत राजकीय पावले टाकली. मंडलिक महाडिक यांची मसल आणि मनी पॉवर एकत्र आल्याने पुढच्या काळात त्यांना शह देणारे कोणीच नव्हते. परंतु अनेक वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व केलेले, पक्षीय विचारांशी बांधील राहून काम करणारे नेते, कार्यकर्ते या जोडगोळीमुळे राजकारणात हैराण झाले. त्यांनी दोघांना एकमेकांना दूर करण्याचा कॉग्रेस पक्षपातळीवर प्रयत्न झाले. महाडिक यांनी दस्तुरखुद्द शरद पवार यांच्याही काही राजकीय सूचना मान्य केल्या नाहीत. त्यामुळे सदाशिवराव मंडलिक यांना त्यांच्यापासून दूर करण्याचे प्रयत्न सहज सोपे झाले.
त्यानंतरच्या काळात महाडिक-मंडलिक कधी सोयीने एकत्र आले तर कधी एकमेकांविरुद्ध लढले. २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून लढलेल्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना महाडिक यांनी पाठिंबा दिला. एवढेच नाही तर रसदही पुरविली. २००९ च्या खासदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना तिकीट नाकारले म्हणून अपक्ष लढणाऱ्या सदाशिवराव मंडलिक यांना महाडिक यांनी छुपी मदत केली तर २०१४ मध्ये संजय मंडलिक यांच्या विरोधातच धनंजय महाडिक यांनी निवडणूक लढवून जिंकले होते तर २०१९ च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. आता मात्र मंडलिकांना निवडून आणण्याची जबाबदारी क्लस्टर प्रमुख म्हणून महाडिक यांनी उचलली आहे.