‘कोल्हापूर’ राज्यात द्वितीय
By Admin | Published: May 26, 2016 12:04 AM2016-05-26T00:04:07+5:302016-05-26T00:20:41+5:30
मुलींची बाजी : विभागाचा निकाल ८८.१० टक्के; विभागात सातारा तृतीय स्थानावर
कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल यावर्षी ८८.१० टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ४.०३ टक्क्यांनी घटला आहे. टक्का घसरला असला तरी, कोल्हापूर विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ८८. ८१ टक्क्यांसह अव्वल स्थान मिळविले आहे. सांगलीने ८७.९० टक्क्यांसह द्वितीय स्थान अबाधित ठेवले असून, गतवर्षी प्रथम स्थानी असणारा सातारा जिल्हा ८७.३२ टक्क्यांनी तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे
प्रमाण मुलांपेक्षा १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला.
शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल व सचिव शरद गोसावी यांनी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. यावेळी बी. एस. शेटे, डी. वाय. कदम, डी. बी. कुलाळ, आदी उपस्थित होते. कोल्हापूर विभागातून ७४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील १,२०,६१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी १,०६,२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ८८.१० इतकी आहे. या परीक्षेसाठी एकूण ७१,३५७ मुले तर, ५३,७५५ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५७,६४६ असून, त्यांचे प्रमाण ८०.७९ टक्के इतके आहे, मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४९,९९१ असून, त्यांचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील २७४ कनिष्ठ महाविद्यालयांतून ४९,९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी ४४,३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.८१ टक्के आहे.
सांगली जिल्ह्णातील २४७ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३३,५७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी २९,५०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८७.९० टक्के आहे. सातारा जिल्ह्णातील २२७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३७,०६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांतील ३२,३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८७.३२ टक्के आहे. विभागात सलग पाचव्या वर्षी उत्तीर्णतेमध्ये मुलींनी आपली आघाडी कायम राखली आहे. गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३ जून) दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधणार
निकालात कमी-अधिक होत राहते. कोल्हापूर विभागाच्या तेरा वर्षांत पहिल्यांदा गेल्या वर्षी ९२.१३ टक्के इतका निकाल लागला. त्यात फारशी वाढ अथवा घट होणे अपेक्षित नव्हते. यावर्षी विभागाच्या घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधली जातील, असे मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी सांगितले. ते म्हणाले, कारणांचा शोध घेऊन त्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. गेल्यावर्षी ०.५९ टक्क्यांनी वाढूनही कोल्हापूर विभाग तृतीय क्रमांकावर होता. यंदा टक्केवारी घटली असली तरी, राज्यात विभागाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
जिल्हानिहाय निकाल
जिल्हाटक्केवारी
कोल्हापूर८८.८१
सांगली८७.९०
सातारा८७.३२
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १२.२१ टक्क्यांनी अधिक
कोल्हापूर विभागाचा निकाल ४.०२ टक्क्यांनी घटला
विभागात कोल्हापूरची आघाडी
गैरप्रकार निम्म्याने घटले.