दुय्यम निबंधक कार्यालय खुले, पण प्रतिसाद कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:45+5:302020-12-13T04:37:45+5:30
कोल्हापूर : दस्तनोंदणीतील सवलतीचा फायदा नागरिकांना घेता यावा म्हणून शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहिले; पण ...
कोल्हापूर : दस्तनोंदणीतील सवलतीचा फायदा नागरिकांना घेता यावा म्हणून शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहिले; पण लोकांना या निर्णयाची फारशी माहिती नसल्याने प्रतिसाद कमी मिळाला. भवानी मंडपातील कार्यालयात तुरळक गर्दी होती.
सहनिबंधक दु्य्यम वर्ग दोन, करवीर क्रमांक एक, सहदुय्यम निबंधक वर्ग दोन, करवीर क्रमांक दोन, करवीर क्रमांक तीन व चार, दुय्यम निबंधक वर्ग दोन, इचलकरंजी क्रमांक दोन, शिरोळ दुय्यम निबंधक श्रेणी एक, हातकणंगले, कागल, मुरगूड, गडहिंग्लज, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी दुय्यम निबंधक श्रेणी एक अशी कार्यालये सुरू राहिली.
आता चौथ्या शनिवारी (दि. २६) देखील ही कार्यालये सुरू आहेत. सरकारी कार्यालयांचा पाच दिवसांचा आठवडा झाल्याने नागरिकांची सोमवार ते शुक्रवार या दिवशी काम करताना झुंबड उडते. दरम्यान, सरकारने अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी दस्तनोंदणीवर सवलत लागू केली आहे. घर, जमिनीसह मालमत्ता खरेदीसाठी ही सवलत आहे. ती या महिनाअखेरपर्यंत लागू असणार आहे. अजून मुदतवाढीचा आदेश आलेला नाही. त्यामुळे केवळ शासकीय सुट्टीमुळे लाभापासून कोणी वंचित राहू नये म्हणून ही कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती; पण कार्यालये सुरू राहतील याची माहिती सर्वांपर्यंत न पोहोचल्याने याचा लाभ घेण्यावर मर्यादा आली.
फोटो: १२१२२०२०-कोल-दस्त ०१, ०२
फोटो ओळ : कोल्हापुरातील भवानी मंडपातील दस्तनाेंदणी कार्यालय शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही सुरू राहिले. अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते; पण नागरिक मात्र फारसे दिसत नव्हते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)