बंद मुठीतील गुपित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:56 AM2019-01-11T00:56:39+5:302019-01-11T00:57:32+5:30

गत आठवड्यात इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. हे १०६ वे अधिवेशन. पहिले अधिवेशन १५ ते १७ जानेवारी १९१४ या कालावधीत कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे भरले. दोन ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ प्रा. जे. एल. सायमन्सन आणि प्रा. पी. एस. मॅकमोहन यांच्या पुढाकारातून याची सुरुवात झाली.

The secret of closed fists | बंद मुठीतील गुपित

बंद मुठीतील गुपित

Next

विज्ञान--

डॉ. व्ही. एन. शिंदे

गत आठवड्यात इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन पार पडले. हे १०६ वे अधिवेशन. पहिले अधिवेशन १५ ते १७ जानेवारी १९१४ या कालावधीत कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे भरले. दोन ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ प्रा. जे. एल. सायमन्सन आणि प्रा. पी. एस. मॅकमोहन यांच्या पुढाकारातून याची सुरुवात झाली. १०५ संशोधकांनी पहिल्या अधिवेशनात भाग घेतला. विज्ञानप्रेमी सर आशुतोष मुखर्जी अध्यक्ष होते. त्याकाळी सहा गट होते. या सहा गटांत ३५ शोधनिबंध वाचण्यात आले. आज ६०,००० पेक्षा जास्त सभासद आहेत. गटांची संख्या १४ झाली आहे. शोधनिबंधांची संख्या २००० पेक्षा जास्त आहे. १९४७ ला पंतप्रधान नेहरू अध्यक्ष होते. ते ३४ वे अधिवेशन होते. तेव्हापासून दरवर्षी पंतप्रधान या अधिवेशनाचे उद्घाटन करतात.

यंदाचे १०६ वे अधिवेशन ३-७ जानेवारी २०१९ या कालावधीत फगवारा येथील लवली प्रोफेशनल विद्यापीठात पार पडले. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून भविष्यातील भारत’ हा या वर्षीचा मुख्य विषय होता. अधिवेशनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपयुक्त संशोधनावर भर देण्याची गरज व्यक्त केली. संशोधनात स्वस्त वैद्यकीय सेवा, निवास, स्वच्छ हवा, पाणी, भरपूर ऊर्जा आणि कृषी उत्पादन वाढविण्यावर भर हवा, असे सांगितले. यावेळी उपस्थित दोन्ही विदेशी नोबेल विजेत्या परदेशी संशोधकांनी, ‘उपयुक्त संशोधन होण्यासाठी मूलभूत संशोधन हे महत्त्वाचे आहे. मूलभूत संशोधन करण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे,’ असे आग्रही प्रतिपादन केले. यासाठी सरकारनेच निधी उपलब्ध करून द्यायला हवा, असेही सांगितले. यात मतभिन्नता असली तरी या तिघांनीही वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून समयोचित भाष्य केले.

काही भारतीय संशोधकांनी मात्र त्या ठिकाणी मांडलेली मते वैज्ञानिक होती का, याचा विचार करणे आवश्यक आहे. मागे एका मंत्रिमहोदयांनी डार्विनच्या सिद्धांताच्या सत्यतेवर आक्षेप घेतला होता. तो इतका गांभीर्याने घेण्याची गरज वाटली नाही; कारण ते मत एका राजकीय नेत्याचे होते. या अधिवेशनात त्याहीपुढे जाऊन काही संशोधकांनीच अशी मते मांडल्याने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

या अधिवेशनाचा मुख्य विषय भविष्यातील भारताबाबत होता; मात्र अनेक तज्ज्ञांनी भूतकाळातील भारताबद्दल शोधनिबंध सादर केले. रामायण, महाभारत ही महाकाव्ये की इतिहास, हा विषय अनेकदा चर्चेत येतो. मात्र, अशा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वैज्ञानिकांच्या संमेलनात आमच्याकडे सर्व अस्त्र, शस्त्रे, प्रक्षेपणास्त्रे कशी होती, हे सांगण्यात अनेकांनी धन्यता मानली. कौरवांचा जन्म टेस्टट्यूब बेबीच्या तंत्राने झाला. रावणाकडे चोवीस विमाने होती. श्रीलंकेत भव्य विमानतळ होते, असा दावा आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागेश्वर राव यांनी केला.
हे सर्व वाचून मला एक घटना आठवली. मी मित्राच्या नवजात बाळाला पाहायला गेलो होतो.

मित्राचे वडील गुरुजी होते. त्यावेळी ते पाचवीतील नातवासोबत आले. त्या नातवाने भावाला पाहिले. नंतर तो दवाखान्यातील इतर बाळे पाहू लागला. थोड्या वेळात तो परत आला आणि आजोबांना त्याने प्रश्न विचारला,‘सर्व बाळांच्या मुठी का बंद असतात?’ गुरुजींनी सांगितले, ‘बाळा, त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. सत्य जाणून घ्यायची ओढ असते.’ मला ते उत्तर खूप आवडले आणि पटलेही. लहान मुलाकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, हे नंतर अनुभवलेही. आज ही घटना आठवली आणि प्रश्न पडला, अशी अवैज्ञानिक विधाने करणारे संशोधक उघड्या मुठी घेऊन जन्माला आले असतील का?

कानन कृष्णन या संशोधकाने तर आईन्स्टाईन आणि न्यूटन यांना गुरुत्त्वाकर्षण कळलेच नव्हते. सापेक्षतावादाचा सिद्धांत पूर्णत: चुकीचा आहे, असे अनेक विस्मयकारक दावे केले.
सकारात्मक बाब एवढीच की, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार आणि जैवरसायनशास्त्र विषयातील नामवंत संशोधक के. विजय राघवन यांनी, अशा अवैज्ञानिक भाषणाबद्दल गुन्हे नोंदवावेत, असे म्हटले.

(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)

Web Title: The secret of closed fists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.