सेक्युलर कला प्रदर्शनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:16 AM2018-09-17T01:16:09+5:302018-09-17T01:16:12+5:30
कोल्हापूर : भारतीय सद्य:स्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘सेक्युलर कला प्रदर्शना’ला रविवारपासून शाहू स्मारक भवन येथे सुरुवात झाली. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शनिवार (दि. २२)पर्यंत चित्र प्रदर्शन सुरू राहणार आहे.
सेक्युलर मूव्हमेंटच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त पाचगणी (जि. सातारा) येथे २५ ते २८ मे २०१८ या कालावधीत ‘अस्वस्थ भारतीय वर्तमान : चित्रकार / शिल्पकारांचे आकलन आणि भाष्य’ या विषयावर चित्रकार / शिल्पकारांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेत निर्माण केलेल्या चित्र / शिल्प कलाकृतींचे आयोजन या प्रदर्शनात करण्यात आले आहे. यावेळी मुंबई येथील सुमेश्वर शर्मा, पुणे येथील प्रा. मर्झबान जाल प्रमुख पाहुणे होते. सेक्युलर मूव्हमेंटचे राज्याध्यक्ष गौतमीपुत्र कांबळे अध्यक्षस्थानी होते.
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, हे चित्र प्रदर्शन शेषितांच्या लढ्यांना बळ आणि ऊर्जा देणारे आहे. भारतातील सद्य:स्थितीचे वास्तव या चित्रांमधून मांडण्यात आले आहे. यावेळी सुमेश्वर शर्मा, प्रा. मुर्झबान जाल, उद्योजक एम. बी. शेख, आदींची भाषणे झाली. प्रा. जे. व्ही. सरतापे यांनी स्वागत केले. स्त्रियांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, मेक इन इंडियातून देश कसा भरकटला आहे याचे वास्तव मांडण्यात आले आहे. यावेळी प्राचार्य. टी. एस. पाटील, डॉ. हरिष भालेराव, डॉ. महावीर अक्कोळे, बबन चहांदे, डॉ. अशोक गायकवाड, रमाकांत घोडके, प्रा. वैशाली पाटील उपस्थित होते.