धर्मनिरपेक्षता ही माणुसकी, नीती ठरावी
By Admin | Published: December 2, 2015 01:03 AM2015-12-02T01:03:59+5:302015-12-02T01:07:56+5:30
सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : गांधींचा खून हा पराभूत मनोवृत्तीतून : भालचंद्र कांगो अविनाश पानसरे व्याख्यानमाला
कोल्हापूर : धर्म आणि नीती यांची गल्लत झाली तर, सामाजिक संघर्ष होतो. सध्या देशात अशीच स्थिती दिसत आहे. ती बदलण्यासाठी धर्मनिरपेक्षता ही माणुसकी, नीती ठरली पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमत’ नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी मंगळवारी येथे केले.येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे ‘लोकशाहीला धर्मांधतेचे आव्हान’ या विषयावरील आयोजित कॉम्रेड अविनाश पानसरे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प संपादक द्वादशीवार यांनी गुुंफले. त्यांचा विषय ‘सेक्युलर’ असा होता. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो होते.
द्वादशीवार म्हणाले, घटनेच्या उद्देशपत्रिकेतील धर्मनिरपेक्षतेला ‘आजार’ म्हणण्याचे धाडस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी केले आहे. त्यावर संसदेत देशातील एकाही खासदाराने सरकारला सुनावले नाही, ही दहशतच आहे. घटना, कायद्यानुसारच्या आणीबाणीद्वारे इंदिरा गांधी यांनी आम्हाला तुरुंगात टाकले पण, त्यांनी आम्हाला मारले नाही. सध्याची आणीबाणी ही धर्मांधांच्या टोळ्यांनी आणली आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे नीतिधर्म. धर्मात नीती आहे पण, सर्व धर्म नीतीवर आधारित नसतात. नीती हे सर्व धर्माला चालणारे मूल्य आहे. मात्र, आपले दुर्दैव म्हणजे धर्माच्या नीतीची दुसरी बाजू घेऊन टोळ्या उभारल्या आहेत. धर्म आणि नीती यांची गल्लत झाल्यास सामाजिक संघर्ष होतो शिवाय धर्म आणि राजकारण या गोष्टी एकत्र आल्यास ते हिंसक होते. त्यात धर्मातील कडवे हे उदारमतवादींना मारतात. अशाच पद्धतीने पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांची हत्या झाली. हे रोखण्यासाठी धर्मनिरपेक्षता आवश्यक आहे. देशात धर्मनिरपेक्षता ही जात सोडून दिली तरच होणार आहे.
डॉ. कांगो म्हणाले, महात्मा गांधींची हत्या ही पराभूत मनोवृतीतून तर, पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांची हत्या विजयाच्या उन्मादातून झाला आहे. ही पराभूत मनोवृती विजयाच्या उन्मादाकडे कुणी, कशी नेली याचे उत्तर घेतल्याशिवाय आज धर्मनिरपेक्षता व लोकशाही धोक्यात का? आहे याचे उत्तर मिळणार नाही; पण, याचे उत्तर अपघाताने का होईना नव्या सरकारने २६ जानेवारीनिमित्तच्या जाहिरातींतून ‘धर्मनिरपेक्षतता’ हा शब्द वगळून दिले. प्रारंभी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रा. विलास रणसुभे यांनी प्रतिष्ठानची माहिती दिली.
पानसरे, दाभोलकर हे अभिमानबिंदू
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर मी दु:खी आणि अस्वस्थ झालो; पण, काही दिवसांनंतर मी पूर्ववत झालो. ज्या मूल्यांसाठी आयुष्य वेचले त्यांच्या रूजवणुकीच्या कार्यात पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी हे शहीद झाले. ही माणसे अभिमान बिंदू झाली पाहिजेत. त्यातून माणुसकीचे राज्य निर्माण होईल, असे द्वादशीवार यांनी सांगितले.
गोळीने माणूस मरतो;
विचार नाही...
व्याख्यानमालेत व्यासपीठाद्वारे एक सामाजिक संदेश, वास्तवाचे दर्शन घडविले जाते. यावेळी नथुरामाने गोळी घातली आणि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस मेला. महात्मा गांधी नव्हे. कारण महात्मा गांधी हा एक विचार आहे. गोळीने माणूस मरतो; विचार नाही, असा संदेश हा जगभरातील काही दहशतवादी हल्ल्यांची छायाचित्रे, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या छायाचित्रांद्वारे दिला आहे.
आजचे व्याख्यान : वक्ते : राजकीय विश्लेषक किशोर बेडकीहाळ. विषय : सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि लोकशाही. वेळ : सायंकाळी सहा वाजता. स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन.