शहा यांच्या सभेमुळे तपोवन मैदानाला सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 04:13 PM2019-10-12T16:13:06+5:302019-10-12T16:18:08+5:30
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उद्या, रविवारी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे सभा होत आहेत.
कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या उद्या, रविवारी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे सभा होत आहेत.
कोल्हापुरातील सभा सकाळी १० वाजता तपोवन मैदानावर होत असल्याने शुक्रवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पाहणी करून बंदोबस्ताची आखणी केली. मैदानाला सुरक्षा कवच राहणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून या मैदानाची रोज बॉम्बशोध पथकासह गुप्तहेर विभागाकडून तपासणी केली जात आहे.
शहा हे विमानतळावर उतरून सभेसाठी ते थेट तपोवन मैदानाकडे रवाना होतील. त्यानुसार विमानतळ ते तपोवन मैदान मार्गाची पाहणी पोलिस अधिकाऱ्यांसह निवडणूक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन तास पाहणी करून आखणी केली. रविवारी सकाळपासून तपोवन मैदानाच्या परिसराला पोलिसांचे सुरक्षा कवच असणार आहे.
सभेला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हालचालीवर साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. या सभेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. ओबी व्हॅनद्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सभास्थळावरील नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. बॉम्बशोध पथक, श्वानपथक, राज्यराखीव दल यांच्यासह दोन हजार पोलीस तैनात असणार आहेत.
हॉटेलची झाडाझडती
शहर व उपनगरांसह राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल, लॉजची पोलिसांकडून झाडाझडती सुरू आहे. या ठिकाणी उतरलेल्या लोकांची माहिती रजिस्टर केली जात आहे. आज, शनिवारी रात्री नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याचे आदेशही जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.