बांधकाम परवान्यासाठी ‘सुरक्षा ठेव’चा घाट
By admin | Published: February 4, 2015 09:55 PM2015-02-04T21:55:54+5:302015-02-04T23:52:50+5:30
कागल नगरपालिका : शासन नियमाप्रमाणे कर आकारणी; ठेवीचा नियमबाह्य बांधकाम काढण्यासाठी उपयोग
जहाँगीर शेख - कागल -अस्ताव्यस्त पसरत चाललेल्या कागल शहरात बांधकाम परवाना मिळविण्यासाठी आणि एकदाचे बांधकाम पूर्ण करून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र कागल नगरपालिकेमधून मिळण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिक घायकुतीला येत असतानाच नगरपालिकेने आता ‘सुरक्षा ठेव’ नावाचा नवा कर आकारण्याचा घाट घातला आहे. यामुळे कागलमध्ये घर बांधायचे असेल तर एकूण खर्चाच्या दोन टक्के रक्कम अनामत म्हणून पालिकेकडे ठेवावी लागणार आहे.
शहरात कोणतेही नवे-जुने बांधकाम करताना सर्वप्रथम ही सुरक्षा ठेव जमा करावी लागेल. २३ नोव्हेंबरच्या शासन नियमाप्रमाणे ही कर आकारणी होत असली तरी मुळातच बांधकाम परवाना फी, विकास शुल्क, एक टक्के सेस आणि कागदपत्रांचा खर्च, याची पूर्तता करावी लागतेच. इतके करून वेळेत बांधकाम परवाना मिळत नाही. साधारणत: दोन महिन्यांत हा परवाना देणे बंधनकारक असते; मात्र चार-पाच महिन्यांचा कालावधी लागतो. संबंधित व्यक्तींना नगरपालिकेकडे हेलपाटे मारावे लागतात.
इतकेच नाही, तर ज्या अभियंत्याकडून आराखडा तयार केला आहे, त्यानेही यासाठी पालिकेच्या विभागाला भेटले पाहिजे, अशी यंत्रणा येथे काम करते. बांधकामच्या काटेकोर नियमांची अंमलबजावणी कोठे करायची आणि कोठे सूट द्यायची, याचा निर्णय हा विभाग घेतो. या विभागाचे समाधान केले की, तेच यातील नियमांच्या पळवाटा काढून देतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर पुन्हा आता नवा ‘सुरक्षा ठेव’ म्हणजे नागरिकांना कागलात घर बांधणे म्हणजे ‘दिव्य’ करण्यासारखा प्रकार होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही नियमानुसार बांधकाम केले आहे, असे या विभागाला वाटले, तरच ही रक्कम परत मिळेल; अन्यथा नियमबाह्य बांधकाम काढून टाकण्याचा खर्च नगरपालिका सुरक्षा ठेवीच्या रकमेतून करेल, असे या सुरक्षा कराचे स्वरूप आहे.
...तर सुरक्षा ठेव परत मिळणार
या सुरक्षा कराबद्दल नगरपालिकेची भूमिका स्पष्ट करताना मुख्याधिकारी प्रभाकर पत्की म्हणाले की, अनेकजण पालिकेकडून नाममात्र बांधकाम परवाना घेतात आणि आपल्याला हवे तसे बांधकाम करून घेतात. पालिकेने कितीही ‘हरकती’ घेतल्या तरी दाद घेत नाहीत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना पालिकेची स्वत:ची यंत्रणा खर्च करावी लागते, म्हणून हा कर आहे. नियमानुसार बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम संबंधिताना परत मिळणार आहे. शासन नियमानुसारच हा कर आकारण्यात येणार आहे.
नागरिकांतून अनेक तक्रारी
आठवड्यापूर्वी कागल नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एक वकील महोदय बांधकाम परवाना वेळेत मिळत नाही, या कारणावरून दाद मागण्यासाठी आले होते. मुळातच नगरपालिकेच्या या विभागाबद्दल नागरिकांमधून अनेक तक्रारी आहेत. एकदा हा सुरक्षा कर म्हणून अनामत रक्कम भरली तर ती परत मिळविताना नागरिकांना हेलपाटेच मारावे लागतील, ही भीती आहे.