अंबाबाई मंदिर परिसरात वाढीव सीसीटीव्हीसह सुरक्षा यंत्रणा, नवरात्रौत्सवानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 04:16 PM2024-09-20T16:16:25+5:302024-09-20T16:17:18+5:30
शिखरांची रंगरंगोटी सुरू, रविवारपासून स्वच्छता..
कोल्हापूर : आगामी शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिर व बाह्य परिसरात वाढीव २० सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, परिसरातील धोकादायक इमारती उतरवून घ्या, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अद्ययावत यंत्रणेने सुसज्ज ठेवा, भाविकांसाठी पार्किंग व मोबाईल स्वच्छतागृहांची सोय करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी गुरुवारी संबंधित प्रशासनाला दिल्या.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील सोयीसुविधांच्या आढावा बैठकीत ते बाेलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्निल रावडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नवरात्रौत्सवाच्या तयारीशी संबंधित सर्व विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, मंदिर व परिसराचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्या, नवरात्रौत्सवात अखंडित वीजपुरवठा राहण्यासाठी महावितरणने काळजी घ्यावी, या काळात मंदिर परिसरात स्वच्छता राखा, त्यासाठी वाढीव मनुष्यबळ लागत असेल तर त्याची सोय करा. शहरात ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करा, मंदिर बाह्य आवारात वैद्यकीय उपचार केंद्रांची सोय करा. पार्किंगसह ठिकठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था करा.
गरुड मंडप दोन दिवसात उतरणार..
नवरात्रौत्सवासाठी गरूड मंडप वेगाने उतरविले जात आहे. पुढील दोन दिवसात मंडप पूर्णत: उतरवले जाईल. परिसराची स्वच्छता झाली की त्यावर मांडव घालण्यात येणार आहे. या मांडवात नवरात्रौत्सव काळात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे धार्मिक विधी केले जातील.
शिखरांची रंगरंगोटी सुरू, रविवारपासून स्वच्छता..
सध्या अंबाबाई मंदिराच्या पाचही शिखरांची रंगरंगोटी सुरू आहे. तर रविवारपासून मंदिर परिसराची स्वच्छता सुरू करण्यात येणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अंतर्गत नियोजन सुरू आहे. नवरात्रौत्सवाच्या चार-पाच दिवस आधी पुन्हा जिल्हाधिकारी तयारीचा आढावा घेणार आहेत.