लवकरच तुम्हाला भेटायला येईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:42+5:302021-02-05T07:11:42+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या बुधवारच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या भावपूर्ण व्हिडीओने दूध संस्थांच्या प्रतिनिधींच्या ...
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या बुधवारच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या भावपूर्ण व्हिडीओने दूध संस्थांच्या प्रतिनिधींच्या डोळ्यात पाणी आणले. आपटे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून ते सभेला येऊ शकत नसल्याने त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केले. लवकरच तुम्हाला भेटायला येईण, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेमध्ये कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या नोटीस वाचनानंतर आपटे यांचा हा व्हिडीओ लावण्यात आला. त्यांची तब्येत पाहून अनेकांना धक्का बसला. कोरोनाच्या काळात जिल्हाभर फिरून गोकुळच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आपटे यांची तब्येत गेल्या तीन महिन्यांपूर्वी बिघडली. तपासणीनंतर त्यांना अन्ननलिकेचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सभेला जाता येणार नसल्याने त्यांनी आपल्या भावना या व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
आपटे म्हणाले, या आजारपणाच्या काळामध्ये महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील माझ्या पाठीमागे पहाडासारखे उभे राहिले. गोकुळमधील सर्वच सहकाऱ्यांनी माझ्या कामाची जबाबदारी आपल्यावर घेतली. गोकुळमधील अधिकारी, कर्मचारी, सर्व क्षेत्रातील मित्र, हितचिंतक आणि लाखो दूध उत्पादकांनी शुभेच्छांचे पाठबळ माझ्यामागे उभे केले. त्यामुळेच शस्त्रक्रियेनंतर आता माझी तब्येत वेगाने सुधारत आहे.
०३०२२०२१ कोल रविंदर आपटे