हे चित्र पाहून वसंतदादा स्वर्गात रडत असतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2015 11:13 PM2015-04-27T23:13:55+5:302015-04-28T00:18:52+5:30
पतंगराव कदम : जयंत पाटील-मदन पाटील यांच्या जिल्हा बँकेतील युतीवर केली टीका--जिल्हा बँक निवडणूक
सांगली : एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले जयंत पाटील आणि मदन पाटील कधी एकत्र येतील असे मला वाटले नव्हते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वसंतदादा घराण्यातील दोन वारसदार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, हे चित्र पाहून वसंतदादा स्वर्गात रडत असतील, असे मत पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, जयंत पाटील आणि मदन पाटील यांचीच भांडणे होती. महापालिका, बाजार समिती आणि बऱ्याच ठिकाणी दोघेजण भांडत होते. आता पुन्हा तेच एकत्र आले आहेत. आता वसंतदादांचे वारसदारच एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, ही गोष्ट बरोबर नाही. युती झाल्यानंतर मला विशाल पाटील यांनी दूरध्वनी करून, दोन टोळ्या एकत्र आल्याची माहिती दिली. कोणत्या टोळ्या आहेत, त्यांचे उद्योग काय आहेत, याची मला माहिती नाही. पण बँकेच्या हितासाठी राजकारण झाले पाहिजे. मतदारांनी या गोष्टीचे भान ठेवून उमेदवार निवडून द्यावेत. जिल्ह्यातील आर्थिक व्यवस्था सांभाळणारी ही महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे याठिकाणी स्वार्थी कारभार उपयोगाचा नाही. लोक आता हुशार झाले आहेत. युती कशासाठी झाली, कोणी केली, बँकेच्या हितासाठी केली की स्वहितासाठी, हे लोक जाणून आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासघात झाल्याचे वाटत असेल, तर त्यांची भावना चुकीची नाही. त्यांना योग्य तेच वाटत असणार. मदन पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा की नाही, या गोष्टीवर आता चर्चा करण्यात अर्थ नाही. मी त्यांच्याकडे याबाबत काहीही विचारणा केली नाही. त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केलेले आहे.
बँकेची सध्याची आर्थिक स्थिती संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. काही कारभाऱ्यांनी ही बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणली. याठिकाणच्या घोटाळ्यांचे किस्से राज्यभर गाजले. त्यांची चौकशी अजून सुरू आहे. या चौकशा कधी थांबत नाहीत. त्यामुळे आज ना उद्या त्या पुन्हा मागे लागणार. बँकेतील चुकीच्या कारभाराची माहिती मिळाल्यानंतर रिझर्व्ह बँक व नाबार्डने प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले. प्रशासक नियुक्तीनंतर लगेचच बँकेची आर्थिक स्थिती सुधारली. सांगलीने संपूर्ण महाराष्ट्राला सहकार शिकवला आणि दुर्दैवाने सांगलीतीलच सहकारी संस्थांची अशी अवस्था झाली. याला कोण जबाबदार आहे, याची कल्पना जिल्ह्यातील जनतेला आहे. त्यामुळे कुणी कितीही टिमकी वाजवत असले तरी बँकेचा कारभार चांगला नव्हता, म्हणून रिझर्व्ह बँक व नाबार्डला कडक पाऊल उचलावे लागले.
प्रशासक नियुक्तीचा अधिकार हा राज्याच्या अखत्यारीतला नाही. त्यामुळे टीका करणारे काहीही सांगत असतात, असे पतंगराव कदम म्हणाले. (प्रतिनिधी)
धोरण बदलते
सिंचन योजनांबाबत शेतकऱ्यांना टंचाई निधीतून मदत केली होती. आता सरकार बदलले आहे. त्यामुळे याबाबतीत धोरणही बदलले आहे. सिंचनाच्या अनुशेषाबाबतही अजूनही पश्चिम महाराष्ट्राच्या नावाने ओरड होत आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.
वाळू माफियांचा बंदोबस्त करावा
वाळू माफियांची दादागिरी वाढत आहे. तहसीलदार, प्रांत, पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांवर बेधडकपणे हल्ले केले जात आहेत. वाळू ठेक्यांमध्ये माफियाच घुसले आहेत. माफियांमुळे नदीपात्रातील नैसर्गिक समतोल बिघडला आहे. वाळू उपशामुळे मगरी आक्रमक होऊन हल्ले करीत आहेत. त्यामुळे वाळू माफियांबाबत राज्य शासनाला ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे कदम म्हणाले
बँकेत भ्रष्टाचार करणारे व न करणारे कोण उमेदवार आहेत, हे मतदारांनी पाहावे. चांगले लोक आल्यास बँकेचे हित साधले जाणार आहे, असे ते म्हणाले.