विक्रमसिंह यांचा पुतळा पाहून भावना अनावर! : राजेचीं हुबेहूब चेहरापट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:26 AM2019-06-15T00:26:59+5:302019-06-15T00:29:48+5:30
देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत एक स्वतंत्र संस्थान म्हणून राज्यकारभार पाहत असलेल्या कागल जहाँगिरीचे वंशज, राजर्षी शाहू महाराजांचे नातू आणि शाहू ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण गुरुवारी एका शानदार समारंभात करण्यात आले. दिवसभरात या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी राजेप्रेमींनी येथे हजेरी लावली
जहाँगीर शेख ।
कागल : देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत एक स्वतंत्र संस्थान म्हणून राज्यकारभार पाहत असलेल्या कागल जहाँगिरीचे वंशज, राजर्षी शाहू महाराजांचे नातू आणि शाहू ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण गुरुवारी एका शानदार समारंभात करण्यात आले. दिवसभरात या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी राजेप्रेमींनी येथे हजेरी लावली.
चेहऱ्यावरील निर्मळ, निरपेक्ष भाव, त्यांचे ते आंनदमय हास्य, परोपकारी नजर, विशाल भालप्रदेश, केसांची स्टाईल, पुढे आलेली हनुवटी ते दातांची रचना, असे अन्य लहान-मोठे बारकावे शिल्पकाराने अचुकपणे बनविल्याने हा पुतळा राजेसाहेबांच्या चेहरापट्टीची हुबेहूब प्रतिकृती भासतो आहे. विक्रमसिंह घाटगे यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाने हा पुतळा पाहून शिल्पकार किशोर पुरेकर (कोल्हापूर) यांच्यावर, तसेच पुतळा समितीवरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. या पुतळ्याचे दर्शन घेताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
तीन महिन्यांत हा ब्राँझचा पुतळा बनविला आहे. समरजितसिंह घाटगे यांनी यासाठी पुतळा समिती बनविली. या समीतीत ते स्वत:ही आले नाहीत. विक्रमसिंह घाटगेंच्या समवेत अनेक वर्षे काम केलेले, त्यांचा मित्रपरिवार, तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींना या समितीत स्थान दिले. परिणामी, सुंदर पुतळा आणि स्मारक उभे राहिले आहे.
कागलच्या घाटगे ज्युनिअर घराण्यातील मृगेंद्रसिंह घाटगे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. प्रवीणसिंहराजे, वर्षादेवी नाडगोंडे, वीरकुमार पाटील, उदय बागी, जयपाल मांगोरे, सुजयसिंह गायकवाड, रामचंद्र खराडे, बाळ पाटील, शिवाजीराव गाडेकर, लेफ्टनंट कर्नल सय्यद, टी. ए. कांबळे, सुनील मगदूम, आदींचा यात समावेश होता. विक्रमसिंह घाटगे यांचा परिवार आणि या समितीच्या प्रयत्नांतून एक चांगले स्मारक आणि शिल्पकृती कागलमध्ये उभी राहिली आहे.
‘त्या’ पंचवीस ते तीस वेळा वर्कशॉपमध्ये....
स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पत्नी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे या पुतळ्याबद्दल खूप भावूक झाल्या होत्या. पुतळा निर्मितीच्या कामात त्यांनी खूप योगदान दिले. गेल्या तीन महिन्यांच्या काळात बापट कॅम्पमधील आमच्या वर्कशॉपमध्ये त्या २५ ते ३0 वेळा आल्या असतील. चार-पाच तास थांबून त्या आमचे काम पाहत होत्या. कौतुक आणि मार्गदर्शनही करीत राहिल्या. महत्त्वाच्या सूचना करीत राहिल्या. जर खरोखरच पुतळा चांगला झाला असेल, तर त्याचे श्रेय सुहासिनीदेवी घाटगे यांनाच आहे. मला आजच्या युगातील महान व्यक्तीचा पुतळा बनविता आला. एवढे माझ्यासाठी खूप आणि पुरेसे आहे, अशी प्रतिक्रिया शिल्पकार किशोर पुरेकर यांनी व्यक्त केली.
इतिहास प्रेमाबद्दलही भित्तिशिल्प हवे
पुतळ्याच्या पाठीमागे जी सात भित्तिशिल्प आहेत. त्यात विक्रमसिंह यांचे कार्य, घराणे, वंशावळ मांडली आहे. यात त्यांच्या इतिहास प्रेमाबद्दलही एक शिल्प असावे, अशी मागणी होत आहे. १९८८ मध्ये त्यांनी कागलमधून रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी युवकांचे एक पथक पाठविले होते. त्यांचा सर्व खर्चर्ही त्यांनी दिला होता. तेव्हा हा दिवस फारसा परिचित झाला नव्हता. विशेष म्हणजे, हे पथक सायकलीने गेले होते, असे या पथकातील सदस्य
अनिल जाधव यांनी सांगितले. पन्हाळा-पावनखिंड पदभ्रंमती, शिवशाहिरांची व्याख्यानमाला, शाहू जयंती, इतिहास संशोधकांना प्रोत्साहन, ग्रंथनिर्मितीला सहाय, असे मोठे कार्य त्यांचे आहे.