कारखान्यांची गोदामे जप्त करा
By admin | Published: January 8, 2015 10:11 PM2015-01-08T22:11:10+5:302015-01-09T00:02:02+5:30
‘स्वाभिमानी’चा इशारा : पहिला हप्ता १५ तारखेपर्यंत न दिल्यास आंदोलनाचा इशारा
सातारा : ‘दि. १५ जानेवारी पर्यंत उसाची पहिली उचल ‘एफआरपी’प्रमाणे न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित कारखान्यांची गोदामे जप्त करावीत, तसेच दूध दरवाढ व आडत रद्द व्हावी. या मागणीसाठी दि. १६ जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते संजय भगत यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत १६ जानेवारी रोजी ११ वाजता सातारा जिल्हा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून, जे कारखाने १५ जानेवारीपर्यंत ‘एफआरपी’प्रमाणे पहिली उचल देणार नाहीत, त्या कारखान्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी व पहिली उचल न देणाऱ्या कारखान्यांविरुद्ध आंदोलनाची दिशा ठरेल, असेही संजय भगत यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर भागात पहिली उचल जादा देण्याची स्पर्धा लागली आहे. मात्र, या उलट सातारा जिल्ह्यात ठरवून बालेकिल्ल्यात असे का, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आता निर्माण झाला असून, कारखानदारांची ही मानसिकता सातारा जिल्ह्यात काँगे्रसच्या बालेकिल्ल्यात का झाली आहे. यांना कायद्याची दहशत राहिली नाही का? का शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत, याचा लेखाजोखा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी कारखानदारांची ऐकी होते. मात्र, आता शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांविरुद्ध एकसंध होऊन लढण्याची वेळ आली आहे. मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन भगत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)