प्लॅस्टिक बाटल्यांच्या खाली लपविलेला विदेशी मद्याचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:25 PM2019-08-23T15:25:28+5:302019-08-23T15:26:41+5:30
कोल्हापूर : फोंडा ते राधानगरी मार्गावर न्यु करंजे येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा हौदा पिकअप जीप राज्य उत्पादन शुल्क ...
कोल्हापूर : फोंडा ते राधानगरी मार्गावर न्यु करंजे येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा हौदा पिकअप जीप राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे पकडली.
यावेळी पाच लाखाचा विदेशी मद्यसाठा प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांच्या ढिगाऱ्याखाली मिळून आला. मद्यासह वाहन असा सुमारे ७ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित राजन नारायण नाईक (वय ४०, रा. सावंतवाडी, खासकीलवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग), शिवराम विश्वनाथ हळदणकर (३०, रा. चराटा, शिल्पग्राम, सावंतवाडी) यांना अटक केली. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भरारी पथकास फोंडा ते राधानगरी मार्गावरुन काही लोक बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतुक करणार असलेची माहिती मिळाली. त्यानुसार या मार्गावर ठिकठिकाणी पथके तैनात करुन पाळत ठेवली. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास न्यु करंजे (ता. राधानगरी) गावच्या हद्दीत पिकअप वाहन येत असल्याचे दिसले. त्याला थांबूवन चालक राजन नाईक याचेकडे चौकशी केली असता रिकाम्या प्लॅस्टीक बाटल्या भरलेल्या गोण्या असल्याचे सांगितले.
गोपनिय माहितीनुसार वाहन हेच असलेची खात्री झाल्याने तपासणी केली असता बाटल्यांच्या गोण्याखाली लपविलेले मद्याचे बॉक्स मिळून आला. मद्यसाठा कोणाला देणार होते. कोठून खरेदी केला, याबाबत चौकशी सुरु असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. ही कारवाई निरीक्षक संभाजी बरगे, जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर श्ािंदे, सचिन काळे, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी केली.