फरार आरोपींची मालमत्ता जप्त करणार

By admin | Published: April 7, 2017 01:08 AM2017-04-07T01:08:11+5:302017-04-07T01:08:11+5:30

दाभोलकर, पानसरे हत्या; गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

To seize properties of the absconding accused | फरार आरोपींची मालमत्ता जप्त करणार

फरार आरोपींची मालमत्ता जप्त करणार

Next



मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यातील फरारी आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.
डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास, या प्रकरणातील फरार आरोपी आणि सनातन संस्थेवर कारवाई करण्याबाबतची लक्षवेधी सूचना गुरुवारी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले की, दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोघा फरार आरोपींचा तपास सुरू आहे. तसेच सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव २०११ सालीच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. फरार आरोपींवर पाच लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले असून रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच फरारी आरोपी लवकर पकडले जावेत, यासाठी त्यांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया प्रस्तावित आहे.
दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आहे. यावर सरकारची काय भूमिका आहे, २०१४ सालीच हा तपास सीबीआयकडे दिलेला असताना खटला का चालत नाही, असे प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केले. शिवाय, आजकाल कोणालाही धमक्या येत आहेत असेही त्या म्हणाल्या. यावर समाजात कोणाला धमक्या येत असतील, तर त्यांची नावे सांगितल्यावर संरक्षण देऊ तसेच सनातनचे संजीव पुनाळेकर यांची वैयक्तिकरित्या चौकशी करता येईल की नाही, हे कायद्याच्या चौकटीतून पडताळून घ्यावे लागेल, असे केसरकर यांनी सांगितले.

Web Title: To seize properties of the absconding accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.