जप्त दारू तपासणीपूर्वीच केली फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:31 AM2021-02-25T04:31:47+5:302021-02-25T04:31:47+5:30

कोल्हापूर : चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाणे व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेली दारू ही दारुबंदी विभागाच्या न्याय ...

Seized liquor seized before inspection | जप्त दारू तपासणीपूर्वीच केली फस्त

जप्त दारू तपासणीपूर्वीच केली फस्त

Next

कोल्हापूर : चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाणे व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेली दारू ही दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली, पण ती तपासणी होण्यापूर्वीच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिऊन फस्त केली. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा अजब प्रकार कोल्हापुरातील ताराराणी चाैकातील दारुबंदी विभागाच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत उघडकीस आला. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून झालेल्या तक्रारीनुसार सात कर्मचाऱ्यांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी सहा जणांना बुधवारी सकाळी अटक केली, तर एक अद्याप फरार आहे.

प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक प्रदीप विजयलाल गुजर (५८, रा. नर्मदा बंगला, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मूळ रा. पुणे) यांनी तपासणीअंती मंगळवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चौघा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील संशयित अटक कर्मचारी : वाहन चालक - वसंत भानूदास गौड (४७, रा. पिंजार गल्ली, आंबेडकर वसाहत, कसबा बावडा), वरिष्ठ सहायक -अक्षयकुमार सखाराम मालेकर (३३, रा. न्यू शाहुपुरी, सुर्वे कॉलनी), कंत्राटी कर्मचारी- मारुती अंबादास भोसले (३४, रा. शाहुपुरी २ री गल्ली), राहुल पांडुरंग चिले (३५, रा. फुलेवाडी ४ था स्टॉप), गणेश मारुती सपाटे (३०, रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ), विरुपक्ष रामू पाटील (२५, रा. विचारेमाळ, सदरबाजार). लॅब असिस्टंट मिलिंद शामराव पोटे (४९ रा. कलानगर, चंदूर रोड, इचलकरंजी) हा अद्याप गायब असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पोलीस ठाणे तसेच उत्पादन शुल्क विभागाने कारवाईत जप्त केेलेली दारू ही तपासणीकरिता कोल्हापुरात दारुबंदी विभागाच्या ताराराणी चौकातील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवली जाते. अशा पद्धतीने विविध कारवायांत जप्त केलेल्यापैकी सुमारे ३१ हजार १७६ रुपये किमतीची दारू ही न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली होती; पण तेथील कर्मचाऱ्यांनी संगनमताने चोरून ती फस्त केल्याचे उघडकीस आले.

‘लॉकडाऊन’मध्ये केली चैन

कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्चअखेरनंतर लॉकडाऊन झाले. दारू विक्रीही बंद होती. या लॉकडाऊन कालावधीत एप्रिल व मे २०२० या दोन महिन्यांत न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत मात्र दारूचा महापूर आल्याचे तक्रारीवरून दिसून येते. या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेले दारूच्या बाटल्या तपासणी करण्यापूर्वीच येथील कर्मचाऱ्यांनी संगनमताने फस्त केल्याचे तक्रारीवरून दिसून येते.

३२ गुन्ह्यांतील ही दारू

कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांच्या तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतील ३२ गुन्ह्यांतील ही तपासणीसाठीची दारू होती. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यावर डल्ला मारल्याचे उघड झाले. दारू तपासणीपूर्वीच हा प्रकार घडल्याने त्या-त्या गुन्ह्याच्या तपासात आता अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले.

निनावी फोनमुळे प्रकार उघड

न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेली दारू तेथील कर्मचारीच फस्त करतात, अशी माहिती दारुबंदीच्या प्रयोगशाळेचे सहायक संचालक प्रदीप गुजर यांना एका खबऱ्याने निनावी फोनद्वारे दिली. त्यांनी तातडीने प्रयोगशाळेत दाखल होऊन तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

Web Title: Seized liquor seized before inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.