जप्त दारू तपासणीपूर्वीच केली फस्त, कुंपणानेच खाल्ले शेत; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:35 AM2021-02-25T01:35:19+5:302021-02-25T06:41:26+5:30
कुंपणानेच खाल्ले शेत
कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाणी व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेली दारू ही दारूबंदी विभागाच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविली ; पण ती तपासणी होण्यापूर्वीच तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पिऊन संपविली. कुंपणानेच शेत खाल्ल्याचा अजब प्रकार कोल्हापुरातील ताराराणी चाैकातील दारूबंदी विभागाच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत उघडकीस आला.याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून झालेल्या तक्रारीनुसार, सात कर्मचाऱ्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी सहा जणांना बुधवारी सकाळी अटक केली, तर एक अद्याप फरार आहे.
प्रादेशिक न्यायसहायक वैद्यकीय प्रयोगशाळेचे उपसंचालक प्रदीप विजयलाल गुजर (वय ५८, रा. नर्मदा बंगला, ताराबाई पार्क, कोल्हापूर. मूळ रा. पुणे) यांनी तपासणीअंती मंगळवारी (दि. २३) रात्री उशिरा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चौघा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतील संशयित अटक कर्मचारी : वाहनचालक - वसंत भानुदास गौड (वय ४७, रा. पिंजार गल्ली, आंबेडकर वसाहत, कसबा बावडा), वरिष्ठ साहाय्यक - अक्षयकुमार सखाराम मालेकर (३३, रा. न्यू शाहूपुरी, सुर्वे कॉलनी), कंत्राटी कर्मचारी - मारुती अंबादास भोसले (३४, रा. शाहूपुरी दुसरी गल्ली), राहुल पांडुरंग चिले (३५, रा. फुलेवाडी चौथा स्टॉप), गणेश मारुती सपाटे (३०, रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ), वीरूपाक्ष रामू पाटील (२५, रा. विचारेमाळ, सदर बाजार). लॅब असिस्टंट मिलिंद शामराव पोटे (४९, रा. कलानगर, चंदूर रोड, इचलकरंजी) हा अद्याप गायब असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
‘लॉकडाऊन’मध्ये केली चैन
कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्चअखेरनंतर लॉकडाऊन झाले. दारूविक्रीही बंद होती. या लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिल व मे २०२० या दोन महिन्यांत न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत मात्र दारूचा महापूर आल्याचे तक्रारीवरून दिसून येते. या प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेले दारूच्या बाटल्या तपासणी करण्यापूर्वीच येथील कर्मचाऱ्यांनी संगनमताने फस्त केल्याचे तक्रारीवरून दिसून येते.