कोरोना नव्हे वाहन जप्तीमुळे वर्दळ रोडावली, शहरातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 11:55 AM2021-04-19T11:55:56+5:302021-04-19T12:00:11+5:30
: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीसुद्धा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यावर पोलीस व महापालिका प्रशासनाने नामी शक्कल लढवत वाहन जप्तीसह रॅपिड ॲंटिजेन टेस्ट सुरू केली आहे. या भीतीपोटी रस्त्यावरील वर्दळच कमी झाली आहे.
कोल्हापूर : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीसुद्धा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यावर पोलीस व महापालिका प्रशासनाने नामी शक्कल लढवत वाहन जप्तीसह रॅपिड ॲंटिजेन टेस्ट सुरू केली आहे. या भीतीपोटी रस्त्यावरील वर्दळच कमी झाली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनप्रमाणेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून अन्य सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा गेल्या चार दिवसांत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती. विशेषत: १६ ते ३० वयोगटातील तरुणाईचा अधिक सहभाग होता. या तरुणाईला आवरताना पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची नाकीनऊ आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलीस दलाने संयुक्तरित्या विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यात वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
एकदा जप्त केलेली वाहने संचारबंदीचा काळ संपल्यानंतर ताब्यात मिळणार असे समजतात अनेकांनी फिरणेच बंद केले. त्यामुळे रविवारी दिवसभर कामाशिवाय फिरणाऱ्यांची संख्या घटली. यासोबतच महापालिका आरोग्य विभागाने गर्दी असेल त्या ठिकाणी थेट विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲंटिजेन टेस्ट करण्याचा धडका सुरू केला आहे. यात जो पॉझिटिव्ह येईल त्याला थेट विलगीकरणात पाठविले जात आहे. यासाठी लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी चौक, मिरजकर तिकटी, राजारामपुरी , दाभोळकर कॉर्नर, छत्रपती ताराराणी चौक, जुना जकात नाका, शाहू जकात नाका, जुना वाशीनाका, संभाजीनगर, सायबर चौक आदी ठिकाणी पोलिसांसह महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील बहुतांशी दुकाने बंद
नेहमी गजबजलेला भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीरोड, महाद्वाररोड, पापाची तिकटी, चप्पल लेन, गंगावेश, राजारामपुरी पहिली गल्ली, शाहूपुरी, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर वाहन जप्तीच्या धास्तीमुळे दिवसभर निमर्नुष्य झाला होता. शहरातील बहुतांशी दुकाने बंद होती.
घर सोडून बाहेर न जाणेच अनेकांनी केले पसंत
योग्य कारण न देऊ शकलेल्या वाहनधारकांची वाहने जप्त केल्यानंतर ती शहर वाहतूक शाखेत अथवा थेट मुख्यालयाच्या मैदानात नेली जात आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांना वाहनाविना चालत जावे लागले. याबरोबर महापालिका कर्मचारीही अशा विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची रॅपिड ॲंटिजेन टेस्ट करू लागले आहेत. यात जर वाहनधारक पॉझिटिव्ह आला तर त्याची रवानगी थेट विलगीकरणात होऊ लागली आहे. याची धास्ती विनाकारण फिरणाऱ्यांनी घेतल्यामुळे रविवारी दिवसभरात अनेकांनी घर सोडून बाहेर न जाणेच पसंत केले.