Kolhapur: शेतकरी वडिलांच्या इच्छेला यशाचे तोरण, दहावीच्या परीक्षेत उदगावच्या सेजलने मिळविले ९८.४० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:47 PM2024-05-28T12:47:27+5:302024-05-28T12:48:57+5:30
जयसिंगपूर : कोणतीही शिकवणी न लावता जयसिंगपूर येथील आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी सेजल पोपट मगदूम (रा. उदगाव) ...
जयसिंगपूर : कोणतीही शिकवणी न लावता जयसिंगपूर येथील आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी सेजल पोपट मगदूम (रा. उदगाव) हिने दहावी परीक्षेत ९८.४० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळविले. विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने अभ्यास करून शेतकरी वडिलांची इच्छा पूर्ण केली. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून सेजलने यशाचे तोरण बांधले.
सेजलचे वडील पोपट मगदूम यांनी शेती करून तिला पाठबळ दिले. तिची आई गृहिणी आहे. आई - वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययनातून अत्यंत जिद्दीने व मेहनतीने अभ्यासात सातत्य ठेवले. दररोज पाच तास अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९२ गुण मिळवून ९८.४० टक्के गुणांसह यश मिळविले.
विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे आय. आय. टी. क्षेत्रात करिअर करणार असल्याचे सेजलने सांगितले. सेजलला जनतारा शालेय समितीचे अध्यक्ष महावीर पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, मुख्याध्यापक दीपक वाडकर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन, तर आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले.