‘प्रधानमंत्री आवास’ लाभार्थ्यांची निवड इतर यंत्रणेकडून करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:30+5:302021-09-05T04:27:30+5:30
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ लाभार्थींची निवड करण्यापासून सगळी प्रक्रिया ग्रामसेवकांनी पूर्ण केली आहे. आता ...
कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ लाभार्थींची निवड करण्यापासून सगळी प्रक्रिया ग्रामसेवकांनी पूर्ण केली आहे. आता पात्र, अपात्र ठरवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर न देता, इतर यंत्रणेकडून घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६ चे जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार व जिल्हा सरचिटणीस के. टी. सिताफ यांनी केली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ पात्र-अपात्र कामाचे तत्काळ निवड करण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. ग्रामीण भागात आवास योजनेचे प्राथमिक काम ग्रामसभा बोलावून लाभार्थी निवड करणे, सदर यादी पंचायत समितीकडे सादर करणे, यादी ऑनलाईन करणे, आधार लिंकिंग काम पूर्ण करणे, ही सर्व कामे ग्रामपंचायतमार्फत ग्रामसेवकांनी पूर्ण केली आहेत. सर्व प्रक्रियेनंतर आता नव्याने पात्र-अपात्र लाभार्थी निवड ग्रामसेवक यांनी करावे हे आम्हाला मान्य नाही.
या योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ग्रामसेवक असल्यामुळे सदर काम आमच्याकडून करण्यात येऊ नये. अन्य पर्यायी यंत्रणा, स्वयंसेवी संस्थेमार्फत करावी. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही युनियनच्या वतीने निवेदन दिले आहे.
स्थानिक इतर जबाबदाऱ्याही ग्रामसेवकावर असल्याने ते प्रचंड तणावाखाली असून प्रपत्र ‘ड’च्या याद्या सर्वेक्षण हे काम ग्रामसेवकांकडे दिल्यास अपात्र लाभार्थी वाद घालून त्यात स्थानिक राजकारणाचा शिरकाव होऊन ग्रामसेवक अडचणीत येऊ शकतो. यासाठी हे काम इतर यंत्रणेकडे द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी. एन. ई. १३६ चे जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार व जिल्हा सरचिटणीस के. टी. सिताफ यांनी केली आहे.