फाइव्ह स्टार व्हिलेज उपक्रमासाठी जिल्ह्यातील पाच गावांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 10:01 AM2020-09-10T10:01:54+5:302020-09-10T10:22:07+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली असल्याचे कोल्हापूर विभागाचे प्रवर अधिक्षक इश्वर पाटील यांनी कळविले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल या पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली आहे.
ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, ग्राहकांना आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा व ग्रामीण भागातील आर्थिक समावेशन योजनेमध्ये समाविष्ट करावे या हेतुने फाई स्टार व्हिलेज कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्यात येणार आहे.
यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून भुदरगड तालुक्यातील मडीलगे बु. व वेसर्डे, हातकणंगले तालुक्यातील दानोळी, गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी, कागल तालुक्यातील कौलगे या पाच गावांची पोस्टाच्या विविध उपक्रमांतर्गत उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली असल्याचे कोल्हापूर विभागाचे प्रवर अधिक्षक इश्वर पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय दूरसंचार व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे हे निवड झालेल्या गावांपैकी भुदरगड तालुक्यातील मडीलगे बु या गावात दि. १० सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजता या योजनेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करणार असून पोस्ट ऑफीस अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांशी थेट संवाद साधणार आहेत.
या योजनेत गावातील प्रत्येक घरात पोस्टाच्या पाच योजना पोहोचवण्यात येणार आहेत यामध्ये सेव्हिंग बँकेच्या योजना, सुकन्या समृद्धी योजना, आयपीपीबी खाते , टपाल जीवन विमा , प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना व जीवन सुरक्षा योजना यांचा समावेश आहे.
जनधन खाते गॅस सबसिडी , शिष्यवृत्ती असे आर्थिक लाभ थेट प्रत्येक कुटुंबाला, नागरिकाला , विद्यार्थ्यांना मिळावेत. पोस्टाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार व्हावेत, आर्थिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फाइव्ह स्टार व्हिलेज कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर पाच गावामध्ये राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातून ५० गावांची निवड करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.