Kolhapur: सेल्फ अन् ग्रुप स्टडी करत लाटवडेच्या अक्षयची पीएसआय परीक्षेत बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:16 PM2024-08-02T12:16:09+5:302024-08-02T12:18:13+5:30
खोची : शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून पिकांचे भरघोस उत्पादन काढण्यात अग्रेसर असणाऱ्या लाटवडे (ता. हातकणंगले) येथील शेतकरी कुटुंबातील अक्षय ...
खोची : शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून पिकांचे भरघोस उत्पादन काढण्यात अग्रेसर असणाऱ्या लाटवडे (ता. हातकणंगले) येथील शेतकरी कुटुंबातील अक्षय माणिक पाटील याने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
शालेय जीवनापासूनच गुणवत्तेत सतत आघाडीवर असणारा अक्षय निश्चितपणे उज्ज्वल यश मिळविणार, अशी त्याच्या आईवडिलांची खात्री होती. गुरुवारी परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये यशस्वी झाल्याची बातमी समजताच आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रचंड परिश्रमातून जिद्दीने त्याने यश मिळविल्याचे वडील माणिक पाटील यांनी सांगितले.
अक्षय याचे माध्यमिक शिक्षण गावातीलच जयवंत हायस्कूलमध्ये झाले.९५ टक्के गुण मिळवून तो वडगांव केंद्रात दहावीत अव्वल ठरला होता. विवेकानंद कॉलेजमधून बारावीत ९१ टक्के गुण मिळवून त्याने राहुरी येथे बी.टेक ॲग्रिकल्चरचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोरोनाच्या कालखंडात राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. तीन प्रयत्नांत अपयश आले. विद्यापीठात स्पर्धा परीक्षेचे वातावरण असल्याने अभ्यासात अधिक गोडी निर्माण झाली.
सेल्फ स्टडी बरोबरच ग्रुप स्टडी करताना मार्गदर्शनाची उणीव जाणवली नाही. सीनियर विद्यार्थी यांनी सतत योग्य मार्गदर्शन केले. अभ्यासिकेत बसून वाचन, नोट्स काढत प्रश्नपत्रिका सोडविल्या. परीक्षेची भीती कधी मनात आणून दिली नाही. आत्मविश्वास खंबीर बनत गेला. पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा दिल्यानंतर यात यश मिळणारच या विचारावर ठाम राहिलो, यश मिळाले असे त्याने सांगितले.