एकगम्यानंद स्वामीजींची निडसोशी मठाच्या नव्या उत्तराधिकारीपदी निवड; रूद्राक्ष, लिंग प्रदान कार्यक्रम उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 12:37 PM2023-03-03T12:37:30+5:302023-03-03T12:37:53+5:30

किल्ले सामानगडच्या गुरव बंधूंनी निडसोशी मठाची स्थापना केली

Selection of Ekagmayananda Swamiji as the new successor of Nidsoshi Math | एकगम्यानंद स्वामीजींची निडसोशी मठाच्या नव्या उत्तराधिकारीपदी निवड; रूद्राक्ष, लिंग प्रदान कार्यक्रम उत्साहात

एकगम्यानंद स्वामीजींची निडसोशी मठाच्या नव्या उत्तराधिकारीपदी निवड; रूद्राक्ष, लिंग प्रदान कार्यक्रम उत्साहात

googlenewsNext

संकेश्वर : निडसोशी (ता. हुक्केरी) येथील श्री दुरदुंडेश्वर मठाचे  उत्तराधिकारी म्हणून रामकृष्ण मिशन मठाचे श्री एकगम्यानंद स्वामीजी यांची निवड केली आहे. यापुढे ते मठाचे दहावे उत्तराधिकारी ( ६ वे निजलिंगेश्वर स्वामीजी) या नावाने ओळखले जातील, अशी घोषणा विद्यमान मठाधिपती श्री पंचम् शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी गुरूवारी(२ मार्च) केली.

निडसोशी मठात आयोजित रूद्राक्ष व लिंग प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. गुरुसिद्धेश्वर स्वामीजी (बेळगाव), त्रिनेत्र स्वामीजी (मंड्या), अल्लमप्रभू स्वामीजी (चिंचणी), चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी (हुक्केरी), गुरुसिद्धेश्वर स्वामीजी (हत्तरगी) संपादना स्वामीजी (चिकोडी) यांची दिव्य सानिध्यात एकगम्यानंद स्वामीजींना लिंग व रूद्राक्ष प्रदान करण्यात आले.

शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले,निडसोशीचे आद्य निजलिंगेश्वर महास्वामीजी यांनी मठाची स्थापना केली. किल्ले सामानगडाच्या पायथ्याशी असलेल्या चिंचेवाडीतील गुरव घराण्यातील आद्य शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी हा मठ बांधला आहे. या मठाची ‘गुरु-शिष्य’ परंपरा फार मोठी आहे.  त्यामुळे सर्व भक्त मंडळींचा अभिप्राय घेवून कायद्याच्या चौकटीतच मठाचे उत्तराधिकारी म्हणून श्री एकगम्यानंद यांची निवड केली आहे. या मठाची वैभवशाली परंपरा ते नक्कीच समर्थपणे पुढे चालवतील.

एकगम्यानंद स्वामीजी म्हणाले, निडसोशी मठात शिक्षण घेताना अध्यात्मिक क्षेत्राची गोडी लागली. त्यामुळे बेळगावच्या रामकृष्ण मिशनमध्ये सहभाग झालो. धारवाड, मंगळूर येथे २० वर्षे सेवा केली. रामकृष्ण मठातर्फे मंगळूरमध्ये राबविलेल्या स्वच्छता अभियानाची दखल देशपातळीवर घेण्यात आली. श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवक म्हणून मठाची उज्वल परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.  यावेळी ‘केएलई’चे अध्यक्ष प्रभाकर कोरे, खासदार आण्णासाहेब ज्वोले, आमदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमास संकेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती, निपाणीच्या हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, हिडकलच्या संगम साखर कारखान्याचे राजेंद्र पाटील,माजी मंत्री ए. बी. पाटील, प्रकाश कणगली, अरविंद कित्तूरकर,नागाप्पा कोल्हापूरे, बाळासाहेब गुरव,रमेश रिंगणे,शंकर हेगडे, राजेंद्र गड्यान्नावर,सुनिल पर्वतराव, आप्पासाहेब शिरकोळी, सोमगोंडा आरबोळे आदींसह बेळगांव व कोल्हापूर जिल्ह्यातील भक्त उपस्थित होते. प्रा.गुरुपाद मरिगुद्दी यांनी प्रास्ताविक केले. संतोष पाटील यांनी आभार मानले.

एकगम्यानंदजी मूळचे ‘निडसोशी’चेच !

अवघ्या चाळीशीतील नवे उत्तराधिकारी एकगम्यानंद स्वामीजी हे निडसोशीचेच असून त्यांचे मूळ नाव मलगौडा पाटील आहे.  त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निडसोशी मठाच्या शाळेतच झाले. कोलकात्ता विद्यापीठातून त्यांनी संस्कृतची पदवी संपादीत केली आहे. गेल्या २० वर्षापासून ते रामकृष्ण मिशन आश्रमाच्या सेवेत आहेत.दिवंगत आद्य निजलिंगेश्वर यांच्यानंतर दुसरा उत्तराधिकारी देण्याचा मान निडसोशीकरांना मिळाला आहे.

Web Title: Selection of Ekagmayananda Swamiji as the new successor of Nidsoshi Math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.