महाराष्ट्र केसरी स्पर्धा: पृथ्वीराज, संग्राम पाटील यांची गादी गटातून निवड, चाचणीस ३०० हून अधिक मल्ल सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 05:51 PM2022-12-05T17:51:09+5:302022-12-05T17:53:11+5:30
माती गटातून निवड झालेल्या मल्लांची नावे जाणून घ्या
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने अहमदनगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा व शहर तालीम संघाकडून विद्यमान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (देवठाणे), संग्राम पाटील (मूळ आमशी) यांची गादी गटातून, तर अरुण बोंगार्डे (बानगे) शुभम सिद्धनाळे (दत्तवाड) यांची माती गटातून निवड झाली.
मोतीबाग तालीम येथे रविवारी महाराष्ट्र केसरी व वजनी गटातील निवड चाचणीस सुरुवात झाली. जिल्ह्यातून या निवड चाचणीस ३०० हून अधिक मल्ल सहभागी झाले होते. गादी गटातून महाराष्ट्र केसरी निवड चाचणीसाठी पृथ्वीराज पाटीलची लढत कौतुक डाफळे याच्याशी झाली. या लढतीत जखमी झालेल्या डाफळेने पुढे चाल दिली. दुसऱ्या लढतीत संग्राम पाटील याने वाकरेच्या तेजस मोरेचा पराभव केला. माती गटातून शुभम सिद्धनाळे याने शित्तूरच्या कुमार पाटील याच्यावर मात केली. दुसऱ्या लढतीत अरुण बोंगार्डे याने मिणचेच्या श्रीमंत भोसले याच्यावर मात केली.
यावेळी खासदार मंडलिक यांनी मंडलिक ट्रस्टच्या वतीने मोतीबाग तालमीच्या नूतनीकरणासाठी ३० लाखांचा धनादेश कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संघाचे पदाधिकारी ॲड. महादेवराव आडगुळे, हिंदकेसरी दीनानाथसिंह, आर. के. पोवार, मारुतराव कातवरे आदी उपस्थित होते.