स्व:भान आणि समाजभान नाटकांमधूनच येते
By admin | Published: December 21, 2016 10:31 PM2016-12-21T22:31:07+5:302016-12-21T22:31:07+5:30
अतुल पेठे यांचे प्रतिपादन : सोशल मीडियाच्या अतिरिक्त प्रभावामुळे सांस्कृतिक दारिद्र्य वाढते
गडहिंग्लज : स्वत: ला पाहता येण्याची कला नाटकातच आहे. त्यामुळे नाटक ही कलावंत आणि प्रेक्षक दोघांचीही गरज आहे. वस्तुस्थितीचे भान देणारा सोंगाड्याही नाटकात महत्त्वाचा आहे. किंबहुना, नाटकातच जीवन असून, खरे स्व:भान आणि समाजभान नाटकातूनच येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी केले.
गडहिंग्लज पालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयातर्फे आयोजित लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘नाटक आणि जीवन’ या विषयावर त्यांनी तिसरे पुष्प गुंफले. ‘कला, साहित्य व नाटक’ याचा परस्परसंबंध विविध उदाहरणांतून त्यांनी स्पष्ट केला. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अकबर मुल्ला होेते.
यावेळी पेठे म्हणाले, दूरदर्शन, मोबाईल, व्हाटस् अॅप व फेसबुकच्या अतिरिक्त प्रभावामुळे माणूस भासमय विश्वात वावरत आहे. त्यामुळेच सांस्कृतिक दारिद्र्य वाढते आहे, ते कमी होण्यासाठी चांगली पुस्तके वाचणे, चांगली नाटके पाहण्याची गरज आहे.
नाटक हे अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. नाटकात जिवंतपणा असतो. त्यातून ताकद मिळते. माणसाची दृष्टी विस्तारते. सकारात्मकता व सृजनशीलतेचा विकास होतो. त्यासाठीच नाटक पाहायला हवे.
कला माणसाला अंतर्मुख व्हायला लावते, विचार करायला लावते, सुसंस्कृत बनविते. धर्म-जातीच्या भिंती तोडते. बुद्धी आणि राज्यसत्तेलाही हलविण्याची ताकद नाटकात आहे, म्हणूनच शाहिरी व नाटकांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठी क्रांती झाली.
मात्र, आज दूरदर्शनच्या आहारी गेल्यामुळे माणसाची दृष्टी प्रदूषित झाली असून, भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, सत्ता राखायची असेल तर मराठी भाषा चांगली आलीच पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्यासह आजी-
माजी नरसेवक व नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्षा प्रा. स्वाती
कोरी यांनी स्वागत व प्रास्ताविक
केले. राजश्री कोले यांनी
सूत्रसंचालन केले. नगरसेवक
दीपक कुराडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘बाप’ जोतिराव.. ‘आई’ सावित्रीबाई !
आजकाल जाती-धर्माचा अभिमान सांगून प्रौढी मिरविली जात आहे. मात्र, आपला खरा बाप जोतिराव फुले आणि खरी आई सावित्रीबाईच आहे. ‘माणूस’ ही आपली जात आणि ‘माणुसकी’ हाच आपला धर्म आहे. अंधश्रद्धेच्या जोखडातून माणसांची व समाजाची मुक्ती करणारे दाभोळकर आणि हयातभर श्रमिक-कष्टकऱ्यांसाठी झगडलेले पानसरे हेच आपले खरे नातेवाईक आहेत, असे अभिमानाने सांगायला हवे. मात्र, तसे सांगणारे कमी आहेत. त्यामुळे ४० महिने उलटले तरी दाभोळकरांचे खुनी सापडत नाहीत, अशी खंत पेठे यांनी यावेळी व्यक्त केली.
साने गुुुरुजी
लोकशिक्षण
व्याख्यानमाला